नाशिकेत सराईत गुन्हेगारांना पोलिसांचा चाबूक: सणासुदीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध !
- ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवापूर्वी नाशिक पोलिसांचा ‘मास्टरस्ट्रोक’, सराईत गुन्हेगारांना बेड्या
लाल दिवा-नाशिक,दि.५ :- शहरात येऊ घातलेले गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शांततेत पार पडावेत यासाठी नाशिक शहर पोलीस दल सज्ज झाले आहे. सराईत गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वात कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत, नाशिक पोलिसांनी शहरातील कुख्यात गुन्हेगारांवर बीएनएसएस, मपोका आणि एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाईचा चाबूक फिरवला आहे. तब्बल ३२६ गुन्हेगारांना सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जमवाजमवी आणि गैरकृत्ये रोखण्यासाठी बंदीचे आदेश देण्यात आले आहेत (बीएनएसएस कलम १६३). समाजविघातक कृत्ये आणि हिंसाचाराला खतपाणी घालणाऱ्या २५० हून अधिक गुन्हेगारांवर बीएनएसएस कलम १६८ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या आणि समाजासाठी धोकादायक ठरणाऱ्या ४५ गुन्हेगारांना मपोका कलम ५५, ५६, ५७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहरातील एका कुख्यात गुंडावर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाने कंबर कसली आहे. गुन्हे शाखेअंतर्गत चार विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके संशयित व्यक्तींवर ‘हॉक-आय’ ठेवून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतील. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि समाजाचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या गुन्हेगारांवर या पथकांकडून वेळीच कारवाई केली जाईल.
पोलिसांच्या या कडक कारवाईमुळे गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शांततेत पार पडतील याची खात्री पोलिसांनी व्यक्त केली आहे. नाशिक पोलीस दलाच्या या सज्जतेमुळे शहरातील नागरिकांमध्ये निश्चिंतीची भावना निर्माण झाली आहे.
ला