अभियंता दिलीप वाघांचा शासनाला सवाल: सर्वसामान्यांनी उत्पादित केलेली वीज खरेदी करा!
लाल दिवा-नाशिक,दि.२:-पवन नगर येथील अभियंता दिलीप वाघ यांनी सर्वसामान्यांनी उत्पादित केलेली सौर ऊर्जा शासनाने खरेदी करावी, या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे
वाढत्या डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या किंमतींमुळे देशाचे परकीय चलन वाया जात असून मोठे उद्योजकच याचा फायदा घेत आहेत, असा आरोप वाघ यांनी केला आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढावा यासाठी शासनाने सबसिडी दिली आहे, परंतु ही वीज केवळ स्वतःच्या वापरापुरती मर्यादित आहे.
वाघ यांची मागणी आहे की, सर्वसामान्य नागरिकांनी सौर ऊर्जा प्रकल्पांतून निर्माण केलेली वीज शासनाने सरकारी दराने खरेदी करावी. यामुळे नागरिकांना उत्पन्नाचे एक नवीन साधन मिळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
वाघ यांच्या सोसायटीच्या छतावर देखील सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, प्रत्येक नागरिकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून वीज निर्मिती करावी आणि ती सरकारला विकावी. यामुळे पेन्शन योजनेवर अवलंबून न राहता नागरिकांना स्वतःचे उत्पन्न मिळवता येईल.
शासनाने लवकरात लवकर या मागणीसंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी वाघ आणि त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. यावेळी जयेश पटेल, अविनाश येवले, संदीप क्षीरसागर, पी एच चांदसरे, तुकाराम बागुल, मंगेश वाघ, राजेश दाते आणि ऑल इंडिया रेन्यूएबल असोसिएशनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष अमित पाटील उपस्थित होते.
वाघ यांच्या या उपोषणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्या मागणीला पाठिंबा वाढत आहे.