संविधानाचा अपमान थांबवा! “मुख्यमंत्री अमृततुल्य”, “आमदार अमृततुल्य” चहा टपऱ्यांच्या पाट्या हटवण्याची मागणी !
लाल दिवा-मुंबई,दि.४ : राज्यातील चहाच्या दुकानांवर “मुख्यमंत्री अमृततुल्य”, “आमदार अमृततुल्य” अशी संविधानिक पदांचा वापर करून लावण्यात आलेल्या पाट्या तातडीने हटविण्यात याव्यात, अशी मागणी नमो चे कार्यकारी अध्यक्ष चंदन पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पवार यांनी म्हटले आहे की, संविधानिक पदांचा खाजगी व्यवसायांसाठी वापर करणे बेकायदेशीर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही पद्धत फॅशन म्हणून वाढत असून, संविधानिक पदांचा अपमान होत आहे. भविष्यात याच धर्तीवर “भारत सरकार अमृततुल्य”, “सर्वोच्च न्यायालय अमृततुल्य” अशाही पाट्या लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
पवार यांनी पुढे म्हटले आहे की, काही लोक संविधानिक पदांची चेष्टा करून सरकारलाच आव्हान देत आहेत. ते म्हणाले, “कुठलाही कायदेशीर व्यवसाय करणे चुकीचे नाही, परंतु संविधानिक पदांनाच आव्हान देणे योग्य नाही. चहाचा व्यवसाय करणाऱ्यांनी याचा विचार करावा.”
पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पाट्या हटविण्यासाठी दुकानांच्या मालकांना नोटीस बजावण्याची विनंती केली आहे. तसेच, नोटीसनंतरही पाट्या न काढल्यास प्रशासनाने त्या स्वतःहून काढाव्यात आणि पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी दुकानांच्या चालकांना कडक सूचना द्याव्यात असेही त्यांनी म्हटले आहे.