मतदार जनजागृतीसाठी नवयुवकांचा सहभाग महत्वाचा……जिल्हाधिकारी जलज शर्मा जिल्ह्यातील 51 महाविद्यालयांचे सामंजस्य करार संपन्न……!
लाल दिवा-नाशिक दि.2: भारत हा लोकशाहीप्रधान देश असून देशातील लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी अधिकाधिक मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे. आगामी निवडणूकींच्या अनुषंगाने या प्रक्रीयेत नवयुवकांना सहभागी करून घेतल्यास येणाऱ्या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात निश्चितच सकारात्मक परिणाम दिसेल असा विश्वास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केला.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित निवडणूक साक्षरता मंडळे (ELC) स्थापना व कार्यपद्धती बाबतच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी कार्यशाळेस सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी जितिन रहेमान, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक डॉ.शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, स्वाती थविल, तहसिलदार (निवडणूक) मंजूषा घाटगे, वर्शिप अर्थ फाऊंडेशन पुणे चे मॅनेजिंग डायरेक्टर तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस गुजराथी, निवडणूक साक्षरता मंडळाचे राज्य मुख्य समन्वयक अल्ताफ पीरजादे, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सेक्रेटरी ॲड. नितिन ठाकरे, जिल्हा समन्वयक अविनाश शिरसाट, स्पेक्ट्रम अकॅडमीचे संचालक सुनिल पाटील, नाशिक स्कूल असोसिएशनचे चेअरमन सचिन जोशी यांच्यासह उपजिल्हा निवडणूक कार्यालयातील अधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यावेळी म्हणाले, जिल्ह्यातही आगामी निवडणूकांच्या अनुषंगाने नवमतदार नोंदणी, मतदार यादीतील त्रूटी दूर करणे, मृत्यू झालेल्या मतदारांची नावे वगळणे यासाठी निवडणूक मतदार अधिकारी यांच्यामार्फत मोहिम स्तरावर काम सुरू आहे. 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे 27 ऑक्टोबर, 2023 रोजी प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील नवयुवकांची संख्या ही 2 लाख 19 हजार इतकी असून 20 ते 29 या वयोगटातील युवकांची संख्या ही 17 लाख 80 हजार इतकी आहे. परंतु या संख्येच्या तुलनेत झालेली मतदार नोंदणी लक्षता घेता जिल्ह्यातील नवयुवकांची नोंदणी वाढविणे गरजेचे आहे. यासाठी महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे सहकार्य अपेक्षित आहे. महाविद्यालयीन स्तरावर नवयुवकांची मतदार नोंदणी वाढविण्याच्या दृष्टीनेच आजच्या कार्यशाळेचे आयोजन केले असून यात महाविद्यालयांचे ,शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य व कोचिंग क्लासेसचे संचालक यांनाही सामंजस्य कराराच्या माध्यमातून सहभागी करण्यात येणार आहे. महाविद्यालयात यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पला स्वतः: भेट देवून नवयुवकांचा उत्साह याकामी वाढविणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी सांगितले.
पात्र विद्यार्थी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी लोकशाहीच्या या शाळेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत आहोत. यासाठी विद्यार्थ्यांचा सहभागही यात शंभर टक्के आवश्यक आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया जवळून अनुभवयास मिळणार आहे. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची सेवा निवडणूक मतदान व मत मोजणी कामासाठी उपयोगात आणली जाणार आहे. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य यांचीही जबाबदारी मोठी आहे. महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांची नोंदणी त्यांनी करून घ्यावयाची आहे. येणाऱ्या सहा महिन्यांत हे मोठे काम सर्वांनी मिळून पार पाडावयाचे असून यात सर्वांनी उस्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक डॉ.शशिकांत मंगरूळे यांनी आपल्या मनोगतातून केले.
वर्शिप अर्थ फाऊंडेशन पुणे चे मॅनेजिंग डायरेक्टर तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस गुजराथी आपल्या मनेागतात म्हणाले, जिल्हा निवडणूक शाखा, नाशिक व वर्शिप अर्थ फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. युवाशक्तीचा सहभाग निवडणूक प्रक्रीयेत वाढविणे हाच या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असून या कार्यशाळेत आज 51 महविद्यालयांचे सामंजस्य करार संपन्न झालेले आहे. या कार्यशाळेत सहभाग नोंदवून मतदान जनजागृतीसाठी व नवयुवक नोंदणीसाठी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महाविद्यालयांना 50 हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. या कार्यशाळेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांची इंटर्नशीप देण्यात येणार असून या इंटर्नशीपच्या प्रमाणपत्राचा भविष्यात परदेशात शिक्षणासाठी उपयोग विद्यार्थ्यांना होणार असल्याचे श्री. गुजराथी यांनी योवळी सांगितले.
- यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकचे सेक्रेटरी ॲड.नितिन ठाकरे, स्पेक्ट्रम अकॅडमीचे संचालक सुनिल पाटील, नाशिक स्कूल असोसिएशनचे चेअरमन सचिन जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सीमा पेठकर तर तहसिलदार मंजुषा घाटगे यांनी आभार व्यक्त केले.