चोरीची घटनाः नाशिकरोड बस स्थानकावर महिला प्रवाशाची दीड लाखांची रोकड आणि दागिने चोरी
नाशिकरोड बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत दीड लाखाची चोरी
लाल दिवा-नाशिक,दि.९ :-नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेरील बसस्थानकावर एका महिलेच्या पर्समधून १ लाख ९५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सौ. शुभांगी सुरेश बडगुजर (वय ४४, रा. पिंप्री खुर्द, ता. धरणगाव, जि. जळगाव) या ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास सातपूरला जाण्यासाठी बसस्थानकावर आल्या होत्या. त्या सी.टी.लिंक बस क्रमांक २४५ मध्ये चढत असताना त्यांच्या उजव्या खांद्याला अडकवलेल्या पर्सची चेन कोणीतरी उघडली आणि आतील सर्व दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.
चोरीला गेलेल्या मालमध्ये ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगले (३० हजार रुपये), ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल (१७ हजार रुपये), २ तोळे वजनाची सोन्याची माळ (६० हजार रुपये), ७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा (२० हजार रुपये) आणि इतर दागिने तसेच ३५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०१/२०२४ अन्वये भादंवि कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यवंशी या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.