मांजा माफियांचा खेळ खल्लास! सपकाळेंच्या नेतृत्वात पोलिसांची धाडसी कामगिरी
१०१ नायलॉन मांजाचे गट्टू जप्त
लाल दिवा -नाशिक,दि.९:- आकाशात रंग उधळणाऱ्या पतंगांच्या उत्साहावर विरजण टाकणाऱ्या, जीवघेण्या नायलॉन मांजाच्या सावटाला नाशिक पोलिसांनी पूर्णविराम दिला आहे. पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वात झालेल्या एका धाडसी कारवाईत पोलिसांनी मांजा माफियांचे कंबरडे मोडत, तब्बल ८०,८०० रुपये किमतीचा १०१ नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले आहेत. यामुळे नाशिककरांच्या मनात आनंदाचा झेंडा फडकला आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमच कटिबद्ध असलेले नाशिक शहर पोलीस दल, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, नायलॉन मांजाच्या विरोधात ठामपणे उभे राहिले आहे. दि. ०३/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आणण्यात आली होती
या धाडसी कारवाईचे सूत्रधार म्हणजे पोलीस उपायुक्त परिमंडळ २ श्रीमती मोनिका राउत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र सपकाळे यांनी आपल्या टीमसह ही कामगिरी पार पाडली.पो. अंम. गौरव गवळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीचा धागा पकडत, सपकाळे यांनी सैलानी बाबा चौकात जाळे पसरले. पो. उप. निरीक्षक प्रभाकर सोनवणे, पो. हवा. इमरान शेख, पो. अंम. गौरव गवळी आणि पो.अंम. अनिल शिंदे यांचे पथक जणू काही वाघाच्या झेपेप्रमाणे संशयितावर तुटून पडले. जुना सायखेडा रोडवरील गणपती मंदिराजवळ प्रज्वल गुजाळ नावाच्या संशयिताला ताब्यात घेऊन, त्याच्याकडून दोन नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले.
गुजाळने यश कांगणे आणि शुभम गुजर यांची नावे उघळ केल्यावर, सपकाळे यांच्या टीमने त्या दोघांनाही गजाआड केले. त्यांच्याकडून तब्बल ९९ नायलॉन मांजाचे गट्टू सापडले. यामुळे मांजा माफियांचे जाळे उद्ध्वस्त झाले. तिघांनाही अटक करून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण (संरक्षण) अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. नाशिक पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पो. हवा. इमरान शेख यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.