सिन्नर परिसरातून कोयत्याचा धाक दाखवून २० लाखांची बॅग पळविणारा चोरटा गजाआड ….. सिन्नर पोलीसांची कामगिरी
लाल दिवा, ता. २३ : दिनांक २०/०५/२०२३ रोजी सकाळी ०७:४५ वा. चे सुमारास माळेगाव एम.आय.डी.सी., सिन्नर येथील भगवती स्टिल कंपनीचे कॉन्ट्रक्ट सुपरवायझर श्री. चंद्रदीपकुमार सिंग, रा. संजीवनी नगर, सिन्नर हे त्यांचे कंपनीतील कामगार दिपचंद्र जयस्वार यांचे मोटर सायकलवर मागे बसून भगवती स्टिल कंपनीतील कामगारांचे पगाराची रक्कम २० लाख ५३ हजार रूपये घेवून सिन्नर येथून माळेगाव औद्योगिक वसाहतीत जात असतांना अनोळखी चोरट्याने हातात कोयता घेवून श्री. चंद्रदीपकुमार सिंग यांचे समोर येवून कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम असलेली कापडी पिशवी हिसकावून जबरीने चोरून नेली होती. सदर बाबत MIDC सिन्नर पोलीस ठाणेस गुरनं २११ / २०२३ भादवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेच्या अनुषंगाने MIDC सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शाम निकम यांनी पोलीस पथकासह घटनास्थळास भेट देवून भगवती स्टिल कंपनीचे आजुबाजूचे परिसराची बारकाईने पाहणी केली असता, फिर्यादीने सांगितलेले हकीकतीप्रमाणे एक काळया रंगाचे पल्सर मोटर सायकलवर काळे टी-शर्ट व निळे रंगाची पॅन्ट परिधान केलेल्या इसमाने सदरचा गुन्हा केला असल्याची खात्री झाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. शाम निकम यांना संशयीत इसमाचे वर्णनावरून मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सदरचा गुन्हा हा आदी सोनवणे, रा. शांतीनगर, सिन्नर याने केला असल्याची खात्रीशीर माहीती मिळाली. त्याचा शोध घेतला असता तो घटना घडल्यापासून फरार असल्याचे समजले. सदर इसम हा सिन्नर येथून त्याचे पत्नीस घेवून बाहेरगावी वास्तव्यास जाणार असल्याची बातमी पोलीस पथकास मिळाली होती, त्याप्रमाणे पोलीसांनी शांतीनगर परिसरात रात्रभर सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव आदित्य एकनाथ सोनवणे, वय २४, रा. शांतीनगर, सिन्नर, मुळ रा. समशेरपूर, ता. अकोले, जि. अहमदनगर असे सांगितले.
यातील आरोपी आदित्य सोनवणे यास वरील गुन्हयाचे तपासात विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्यानेच सदर गुन्हा केला असल्याची कबूली दिली आहे. सदर गुन्हयातील जबरीने चोरून नेलेली रोख रक्कम आरोपीने लपवून ठेवली असल्याबाबत सांगितल्याप्रमाणे पोलीस पथकाने रोख १८ लाख ९४ हजार ५०० रूपये हस्तगत केले आहे. यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर अहमदनगर जिल्हयात मालाविरुध्दचे गुन्हे दाखल असलेबाबत माहीती मिळाली आहे. सदर आरोपीस MIDC सिन्नर पोलीस ठाणेकडील वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. शाम निकम यांचे पथक करीत आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीर सिंग साळवे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे एम. आय. डी. सी. सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शाम निकम, सपोनि तुषार गरूड, सपोनि संदेश पवार, पोना भगवान शिंदे, धनाजी जाधव, सागर गिते, नवनाथ चकोर, पोकॉ शशिकांत निकम, विनोद जाधव, चापोकॉ विक्रम टिळे तसेच पोना हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम यांचे पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
पोलीस पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी तपास पथकास २०,०००/- रू. चे बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.