कृषी विज्ञान संकुल काष्टी येथील इमारत बांधकामासाठी 50 कोटी रुपये मंजूर….!
लाल दिवा-नाशिक,ता.७ : पुरवणी अर्थसंकलपीय अधिवेशनात मालेगाव बाह्य मतदार संघातील काष्टी येथील कृषी विज्ञान संकुल काष्टी येथील इमारत बांधकामासाठी 50 कोटी रुपये निधीस आज रोजी मंजुरी मिळाली आहे. नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असून यासाठी सातत्याने पाठपुरावा भुसे यांनी केला आहे.
काष्टी येथील कृषी विज्ञान संकुलात कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय साकारण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, ता. मालेगाव जि. नाशिक येथे कृषी विज्ञान संकुलात कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय ही तीन महाविद्यालये सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती.
- कृषी महाविद्यालय आणि उद्यान विद्या महाविद्यालयाची प्रवेश क्षमता प्रत्येकी 60 असून अभ्यासक्रमाचा कालावधी 04 वर्षांचा आहे तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची प्रवेश क्षमता 40 विद्यार्थ्यांची असून अभ्यासक्रमाचा कालावधी 4 वर्षांचा आहे.
- कृषी महाविद्यालयांचा उद्देश
कृषी विज्ञान संकुलांतर्गत कृषी शिक्षणाबरोबरच कृषी पूरक उद्योग विकास, प्रक्रिया केंद्र, शेतकरी प्रशिक्षण केंद्र व सुविधा केंद्र, आदर्श रोपवाटिका संकुल, सर्व कृषी निविष्ठांचे संशोधन आणि निर्माण केंद्र असे विविध कृषी विषयक उपक्रम विकसित करण्याचे नियोजन आहे. या संकुलामुळे नाशिक जिल्ह्यात एकाच ठिकाणी कृषी शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. कृषी पदवीधारकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, ग्रामपातळीवरील विस्तार, ग्रामसेवक, कृषी मदतनीस, तज्ज्ञ प्रशिक्षक, कृषी संशोधक, आधुनिक शेतकरी यांना सहाय्य करून देशाच्या कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणे, कृषी आधारित स्टार्टअप्स सुरु करणे यासारख्या बाबी साध्य करणे यामुळे शक्य झाले आहे.