रक्ताने माखलेला विकास! उड्डाणपुलाच्या ‘हवेतच’ अडकलेल्या कामाला दोन तरुणांचे बळी! कचने घेतला दोन तरुणांचा बळी; मनपाला जाग येणार का?

उड्डाणपूल झाला असता तर तरुणांचा हकनाक बळी गेला नसता! कचने घेतला दोन तरुणांचा बळी; मनपाला जाग येणार का?…

नाशिक (खास प्रतिनिधी): शहरातील सीबीएस ते सिटी सेंटर मॉल हा रस्ता रक्ताने माखला गेला आहे. काल रात्री घडलेल्या भीषण अपघातात दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले. हा अपघात रस्त्यावरील कचरा आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिके विरोधात संतापाची लाट उसळली आहे. उड्डाणपूल वेळेत पूर्ण झाला असता तर हा हकनाक बळी गेला नसता, अशी खंत व्यक्त केली जात आहे. 

काल रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अभिजित अशोक मराठे (२३) आणि मयूर जगदेव कावरे (२३) हे दोघे मित्र दुचाकीने प्रवास करत होते. बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाजवळील खड्ड्यात त्यांचा दुचाकीचा तोल गेला. अंधारात रस्त्यावर पडलेला कच आणि खड्डे दिसून न आल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही तरुण दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर दुखापत झाल्याने दोघांनाही जागीच मृत्यू आला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. तातडीने दोन्ही तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिजित हा हुशार विद्यार्थी असून तो एमसीएचे शिक्षण घेत होता. तर मयूरने नुकताच आयटी क्षेत्रात नोकरीला सुरुवात केली होती. या दोन्ही तरुणांचे स्वप्न रस्त्यावरील कचऱ्याने हिरावून घेतले आहे.

दरम्यान, या अपघातामुळे नागरिकांनी प्रशासनावर तीव्र टीका केली आहे. “या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र कामाचा वेग अतिशय संथ आहे. त्यातच रस्त्याची दुरावस्था, कचऱ्याचा ढिगारा यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

प्रशासनाला नागरिकांच्या जीवाची काही किंमतच उरलेली नाही,” असा संतप्त सूरांमध्ये नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. 

या अपघाताची पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत रस्त्याची दुरुस्ती करावी, उड्डाणपुलाचे काम वेळेत पूर्ण करावे आणि नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!