पोलीसांच्या उदासीनतेमुळे वाढतायत घरफोड्या? आडगावात २.३३ लाखांची चोरी, पोलिसांकडून अद्याप कुठलीही कारवाई नाही
घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ, नागरिक हैराण
लाल दिवा-नाशिक,दि.१२:-आडगांव (प्रतिनिधी): आडगांव शिवारात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशातच श्रीराम नगर येथील गणराज पार्क अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सचिनराज हिरे यांच्या घरातून तब्बल २ लाख ३३ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे. मात्र, या घटनेनंतरही पोलिसांकडून कोणतीही ठशील कारवाई झालेली नाही, असा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.
११ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० दरम्यान हिरे यांच्या घरात ही चोरी झाली. चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिरे यांनी तात्काळ आडगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी केवळ पंचनामा करूनच थांबावे ठरवले आहे, असा आरोप हिरे यांनी केला आहे. आजपर्यंत चोरट्यांचा शोध लागलेला नाही आणि पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी नाराजी ते व्यक्त करत आहेत.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या उदासीनतेमुळेच घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी रात्रीच्या गस्त वाढवावी आणि चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे