महाशिवरात्रीच्या दिवशी नाशिकचे पालकमंत्री ग्रामीण पोलिसांना पावले…….नाशिक ग्रामीण पोलीस दलात नव्याने एकुण २० चारचाकी वाहन दाखल……!
लाल दिवा-नाशिक,ता.८ :- नाशिक ग्रामीण पोलीस दलास प्राप्त झालेल्या एकूण २० चारचाकी महिंद्रा बोलरो न्युओ एन-४ जीप वाहनांचा लोकार्पण सोहळा माननीय पालकमंत्री श्री. दादाजी भुसे यांचे शुभहस्ते, मा. खासदार श्री. हेमंत गोडसे व मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दत्तात्रय कराळे, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे उपस्थितीत आज रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस परेड मैदान, आडगाव, नाशिक याठिकाणी संपन्न झाला.
नाशिक ग्रामीण पोलीस घटकात एकूण ४० पोलीस स्टेशन, आठ उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कार्यालये, तर अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व मालेगाव विभाग अशी एकूण ५० कार्यालये व इतर शाखा कार्यरत आहेत. सुमारे साडेतीन हजार पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी कार्यरत असलेले जिल्हा ग्रामीण पोलीस दल सुमारे १५,००० चौरस किलोमीटर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्हा ग्रामीण पोलीसांकडे वाहनांची कमतरता भासत होती. उपलब्ध असलेली वाहने मोठ्या प्रमाणावर निकामी झाल्याने पोलीस ठाण्यांच्या एकंदर कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत होता.
अलीकडे नागरीकांच्या तक्रारीची शीघ्रतेने दखल घेण्यासाठी डायल ११२ ही योजना कार्यन्चीत करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत प्रायमरी कॉल सेंटर, नवी मुंबई व सेकंडरी कॉल सेंटर, नागपुर येथून अडचणीत असलेल्या नागरिकांच्या तक्रारींची माहिती शिघ्रतेने त्या त्या जिल्हयांच्या नियंत्रण कक्षात थेट पुरवली जाते. सदर माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाल्यानंतर अशी माहिती अगदी कमी कालावधीत संबंधीत कॉल करणा-या व्यक्तीच्या अधिक जवळ असणा-या वाहनास पुरवली जाते. नागरीकांच्या तक्रारीची शिघ्रतेने दखल घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी ग्रामीण पोलीस दलास वाहनांची असणारी गरज आणखी वाढली होती.
सदरची बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांनी वाहनांबाबतची मागणी जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा यांचे मार्फतीने जिल्हा नियोजन समितीकडे नोंदवली होती. ग्रामीण पोलीस दलास वाहनांची असलेली निकडीची गरज लक्षात घेवून मा. मंत्री सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, नाशिक जिल्हा मा. ना. श्री. दादाजी भुसे यांनी सदर कामास प्राधान्याने मंजुरी देत सदर कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्याने नाशिक ग्रामीण पोलीस दलास सदरची २० महिंद्रा बोलेरो न्युओ एन-४ वाहने खरेदी करू शकले आहेत.
सदर नवीन व सुसज्ज वाहनांच्या उपलब्धतेमुळे नाशिक ग्रामीण पोलीसांना जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न, रात्रगस्त, विविध प्रकारचे बंदोबस्त, नाकाबंदी याबरोबरच पीडीतांचे कॉल स्वीकारून त्यावर शिघ्रतेने कारवाई करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
तसेच महिला दिनाचे औचित्य साधून मा. ना. श्री. दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक जिल्हा, मा. खासदार नाशिक श्री. हेमंत गोडसे व मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दत्तात्रय कराळे, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील महिला अधिकारी व अंमलदार यांना पुष्प देवुन महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.