प्रा.हरी नरके यांच्या सक्षम समीक्षा त्रैमासिक विशेषांकाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन….!
- प्रा.हरी नरके यांचं साहित्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न – मंत्री छगन भुजबळ
- प्रा.हरी नरके यांनी संपूर्ण आयुष्य फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीला वाहून घेतले – मंत्री छगन भुजबळ
- प्रा.हरी नरके आज असते तर आरक्षणाच्या लढाईत त्यांची मोठी साथ असती – छगन भुजबळ
नाशिक,दि.२१ जानेवारी :- प्रा.हरी नरके हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे वैचारिक स्तंभ होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य फुले, शाहू, आंबेडकर चळवळीला वाहून दिलं होते. त्यांनी संशोधन करून निर्माण केलेलं अतिशय दर्जेदार साहित्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्यासाठी आपले प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आज भुजबळ फार्म नाशिक येथे प्रा.हरी नरके यांच्या सक्षम समीक्षा त्रैमासिक विशेषांकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, सक्षम समीक्षा त्रैमासिकाचे संपादक डॉ.शैलेश त्रिभुवन, सुनिता त्रिभुवन, प्रा.हरी नरके यांच्या पत्नी सरिता नरके, अनिल नरके,अखिल भारतीय समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, श्रीकांत बेणी,मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, नाशिक जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, डॉ.योगेश गोसावी, शहराध्यक्षा कविताताई कर्डक, महिला जिल्हाध्यक्षा पुजा आहेर, महिला शहराध्यक्षा आशा भंदुरे, मेघा दराडे, मीनाक्षी काकळीज यांच्यासह समता सैनिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, प्रा.हरी नरके हे फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील एक महत्वाचं नाव होत. त्यांच्या अकाली निधनाने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेसह चळवळीचं कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. कायद्याचा सूक्ष्म अभ्यास आणि संशोधन वृत्ती त्यांच्या अंगी असल्याने विविध वैचारिक प्रसंगात त्यांची साथ अतिशय मोलाची होती. त्यांनी समाजात आपली भूमिका नेहमीच निर्भिड पद्धतीने मांडली. आज आरक्षणाचा जो प्रश्न उपस्थित होत आहे ते जर असते तर त्यांची मोठी मदत ओबीसी चळवळीला झाली असती त्यांची विशेष कमतरता आज जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महात्मा फुले वाडा, भिडे वाडा, नायगाव येथील सावित्रीबाई फुले स्मारक निर्मितीत प्रा.हरी नरके यांचा बहुमोल असा वाटा होता. संशोधनात्मक अभ्यास करून त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा खरा इतिहास सर्वांसमोर मांडला. महात्मा फुले यांचे चित्र, भिडे वाडा, सावित्रीबाई फुले यांचं नायगाव येथील घर यांचे फोटो त्यांनी शोधले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं समग्र साहित्य त्यांनी निर्माण केलं. पुणे विद्यापीठला सावित्रीबाई फुले यांच्या नामांतराची कल्पना देखील हरी नरके यांचीच होती. सामाजिक प्रबोधनात त्यांनी अतिशय महत्वपूर्ण योगदान दिलं असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महापुरुषांचा खरा इतिहास, आरक्षणाच्या प्रश्नावर जनजागृती होण्यासाठी प्रा.हरी नरके, ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे यांनी राज्यभर दौरे करून व्याख्याने दिली. त्यातून मोठ्या प्रमाणात सामाजिक जनजागृती झाली. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार त्यांनी या माध्यमातून मांडले. या प्रबोधन चळवळीत प्रा.हरी नरके यांची उणीव सर्वांना भासत आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेला वैचारिक खाद्य पुरविण्याचे काम प्रा.हरी नरके यांनी संपूर्ण आयुष्यभर केलं. आज या वैचारिक लढ्यात वैचारिक साथ अतिशय आवश्यक होतो.
ते म्हणाले की, प्रा.हरी नरके यांनी टिव्ही मालिकेच्या मध्यमातून फुले दाम्पत्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडण्यासाठी मोलाचे योगदान दिलं. आज सत्यशोधक सारखा अतिशय महत्वाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सत्य घटना यामध्ये मांडलेल्या असून त्या समाजासमोर आज आल्या आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पहावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे म्हणाले की, गेली अनेक वर्ष फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही मांडण्याचे काम प्रा.हरी नरके यांनी केलं. प्रा.हरी नरके यांचं घर हे एक मोठं ग्रंथालय होते. संपूर्ण आयुष्य फुले, शाहू, आंबेडकर चळवळीला वाहून समाज प्रबोधन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या जाण्याने समाजाची मोठी हानी झाली आहे. त्याची जागा भरून काढता येणार नाही त्याची जागा घेता येणार नाही. त्यांनी सर्वांच्या हातात फुले शाहू आंबेडकर परंपरा दिली असे त्यांनी सांगितले.
यावेळी शब्दाली प्रकाशनचे डॉ.शैलेश त्रिभुवन यांनी विशेष अंकाची माहिती देत प्रा.हरी नरके यांचा जीवनपट उलगडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक बाळासाहेब कर्डक यांनी केले.