ओबीसी नेते गजू घोडके उद्या जरांगे पाटील यांना दाखवणार काळे झेंडे…..
पोलीस आयुक्तांकडून गजू घोडके यांच्या आंदोलनाची विचारपूस……!
लाल दिवा ……मराठा आरक्षण प्रश्नाबाबत मार्ग काढण्यास आणि मराठा-ओबीसी हा वाद मिटविण्यास शासनाने खऱ्या अर्थाने जे ओबीसी आणि बारा बलुतेदार नेते असतील त्या सर्वानाही चर्चेसाठी पाचारण करावे,अशी मागणी ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी केली आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी सातत्याने उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी ब्लॅकमेल करून सरकारच्या नाकी नव आणले आहे. ओबीसींच्या काही नेत्यांनी जरांगे पाटलांच्या या मागणीस कडाडून विरोध करून ओबीसींच्या हक्काला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे अशी भूमिका घेतली आहे. यावरून वातावरण तापले. अगदी खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यात आली. याबाबत सन्मान्य तोडगा काढण्यासाठी शासनाने तिघांना एकत्र बोलावून सामंजस्याने तोडगा काढावा अशी सूचना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना गजू घोडके बोलत होते.
ओबीसींचे मसीहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका दबंग नेतृत्वाने ओबीसींचे प्रश्न उचलून धरून त्यांना न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला हे मान्य करावेच लागेल.परंतु शासनाशी चर्चा करतांना सुवर्णंकार,नाभिक,तेली, तांबोळी, शिंपी,सुतार,लोहार आदी समाजाच्या नेत्यांनाही पाचारण करणे गरजेचे आहे. मराठा आरक्षण प्रश्नाबाबत आंदोलन छेडणारे जरांगे पाटील यांना भेटण्यास सर्वजण जाण्याची तत्परता दाखवतात. मात्र ओबीसींच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही सातत्याने लढत आहे. मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्नही केला. जरांगे पाटलांना तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु आमच्या आंदोलनाची साधी दखलही घेतली जात नाही,कुणी आमची साधी विचारपूस करण्यासही येत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. ओबीसी बांधवांचे दुःख जाणून घेण्यासाठी पंकजाताई मुंडे,आ.देवयानी फरांदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पुढे येण्याची गरज आहे.
खऱ्या अर्थाने ओबीसी असलेले सुवर्णकार तसेच इतर बारा बलुतेदार खरोखरच कर्म दारिद्री आहे असेच म्हणावे लागेल. हे बारा बलुतेदार फक्त नावालाच ओबीसी आहेत. त्यांच्या राजकीय राजकीय आणि शैक्षणिक सवलतींचा लाभ कोण लाटतात हे सर्वांना माहिती आहे.पंकजाताईंना लगेचच आमदारकी मिळते तर ओबीसींमधील खऱ्याअर्थाने साडेतीनशे पगड जातींचे प्रतिनिधित्व करणाऱ्याचा आमदारकीसाठी का विचार होत नाही हा खरा सवाल आहे.त्यामुळे मराठा आरक्षण तोडगा काढताना आणि मराठा -ओबीसी वाद मिटवण्यासाठी शासनाने कोणतीही चर्चा करताना केवळ दोघा तिघांना न बोलावता ओबीसींच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या बारा बलुतेदारांच्या सर्व प्रतिनिधींना त्यासाठी प्राचारण करावे,अशी विनंतीही गजू घोडके यांनी केली आहे.