नाशिकमध्ये गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सुरक्षिततेसाठी पोलिसांची खबरदारी, प्रतिबंधित गुन्हेगारांवर धडक कारवाई !
- नाशिकमध्ये 9 गुन्हेगार जेरबंद
- सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई
- गुन्हेगारांना पोलिसांचा इशारा
लाल दिवा-नाशिक,दि.८ – शहरात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस दलाने कंबर कसली आहे. यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार, प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून सराईत गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.
- प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांवर कडक नजर
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. शहरातील काही संवेदनशील ठिकाणे “प्रतिबंधित क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या ठिकाणी पूर्वी गुन्हेगारीत सहभागी असलेल्या आणि हद्दपार करण्यात आलेल्या इसमांना प्रवेश बंदी आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करत आहेत.
- विशेष पथकांची स्थापना
प्रतिबंधित क्षेत्रात गैरप्रकार घडू नयेत आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने विशेष पथके स्थापन केली आहेत. गुन्हे शाखेतील 4 अधिकारी आणि 22 पोलीस कर्मचारी या 4 पथकांमध्ये समाविष्ट आहेत.
- आतापर्यंत 9 जणांवर कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईअंतर्गत आतापर्यंत 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. बी.एन.एस.एस. कलम १६३ अंतर्गत शहराबाहेर हद्दपार करण्यात आलेले अमन खालिद खान, अनिल दत्तू पवार, विकार मोहम्मद शेख, केविन विवेक आसर, आकाश प्रभाकर मोहिते, शौकत सलीम शेख आणि किरण सुभाष भामरे हे प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आल्याने त्यांना पुन्हा शहराबाहेर पाठवण्यात आले आहे. तसेच, मपोका कलम ५६ अंतर्गत कारवाई करून आरबाज उर्फ सोनु रफिक बेग आणि रोहित योगेश पगार यांना अटक करण्यात आली आहे.
- पोलीस आयुक्तांचा नागरिकांना संकल्प
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शांततेत पार पडतील याची खात्री दिली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पुरेसे बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांनी घाबरून न जाता सणाचा आनंद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.