उपनगर पोलिसांची कामगिरी: किराणा दुकानावरील हल्ल्यातील एक आरोपी गजाआड, इतर फरार आरोपींचा शोध सुरू
वायकर यांच्या नेतृत्वात पोलीस तपास सुरू; एक आरोपी गजाआड
नाशिकरोड – भालेराव मळा येथे मेघा किराणा दुकानावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दुकानदार सुभाष हरिश्चंद्र देवानंद शांताराम भालेराव (वय ४९) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास भालेराव हे त्यांचे दुकान बंद करीत होते. त्याचवेळी सागर म्हस्के आणि साहिल म्हस्के हे दोघे दुकानात घुसले. साहिलने भालेरावांच्या डोक्यावर बंदुकीसारख्या दिसणाऱ्या वस्तूने जोरदार वार केला. भालेराव खाली वाकणार तोच सागरने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.
यानंतर, बाहेर असलेल्या धनराज म्हस्के आणि बंटी यांनी दुकानावर काचेच्या बाटल्या आणि ट्रे फेकून तोडफोड केली. या हल्ल्यात दुकानातील साहित्यही नष्ट झाले आहे.
पोलीसांना दिलेल्या तक्रारीत भालेराव यांनी म्हटले आहे की, १९ ऑक्टोबर रोजी या टोळक्याने त्यांच्याकडे दररोज १००० रुपये खंडणी मागितली होती.
याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी महेंद्र सतीश गिल (वय १९), साहिल म्हस्के, सुरेश म्हस्के, धनंजय म्हस्के आणि बंटी या पाचही जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १०९(१), ११५(१), ३५२, ३५१(१), ३२४(१), ३३३, ३०८(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३.५ आणि शस्त्र अधिनियम ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींपैकी महेंद्र गिल याला पोलिसांनी २२ ऑक्टोबर रोजी रात्री अटक केली असून उर्वरित आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर हे करीत असून त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे मार्गदर्शन करीत आहेत.