येरवडा जेलमध्ये जाऊन नाशिक पोलिस घेणार सलीम कुत्ताचा जबाब…!
लाल दिवा-नाशिक,ता.१८ : सुमारे ७ वर्षापूर्वी नाशिक शहराजवळच्या एका खेड्यालगतच्या फार्महाऊसमध्ये झालेल्या रंगारंग पार्टीत १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता हा नाचत होता. त्यासोबत शिवसेना उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हेदेखील नृत्य करताना दिसत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. याबाबत आता बडगुजर यांची पोलिस चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेचे एक पथक लवकरच पुणे येथील येरवडा कारागृह गाठणार आहे. तेथे सलीम कुत्ताचा जबाब पोलिसांकडून याप्रकरणी घेतला जाणार असल्याचे -सूत्रांनी सांगितले.
नाशिक शहरात पार्टी नेमकी कशानिमित्त व कोणी आयोजित केली, हे अद्यापही पोलिसांसमोर आलेले
नाही. बडगुजर काही प्रश्नांची उत्तरे देतात, तर काही उत्तरांसाठी पोलिसांकडे वेळ मागतात. यामुळे साशंकता निर्माण झाली आहे. काही उत्तरे देतानाही त्यांनी सावधगिरी बाळगली आहे. यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित असे समाधानकारक सहकार्य
चौकशीत मिळत नसल्याची पोलिस वर्तुळात चर्चा आहे. यामुळे पोलिस आंता कागदोपत्री भक्कम असे पुरावे संकलित करत असून, सलीम कुत्ताचा जबाब नोंदविण्यासाठी येरवडा कारागृहात एक पथक लवकरच जाण्याची दाट शक्यता आहे.
२०१६ साली बडगुजर यांना एका कार्यक्रमात राडा घालून मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह नऊ संशयितांविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यावेळी न्यायालयाने त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती. साधारणतः आठवडाभर बडगुजर यांना कारावास भोगावा लागला होता. जिल्हा व सत्र न्यायालयाने १३ एप्रिल २०१६ साली २० हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूरकेली होती..