मुलीला जाळून मारण्याची धमकी, आई-वडिलांसमोरच घरात घुसून दहशत.
१४ वर्षांच्या मुलीला जिवंत जाळण्याची धमकी! प्रेमात वेडा झालेला तरुण बेडीपाठ.
लाल दिवा-अंबड,दि.१७ : (प्रतिनिधी) – प्रेमात पागल झालेल्या एका तरुणाने १४ वर्षीय मुलीला जिवंत जाळण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना अंबडमध्ये घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही १४ वर्षांची असून ती १६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता कामानिमित्त घराबाहेर पडली होती. त्याचवेळी आरोपी अभिषेक छगन काळवंडे (वय १८ वर्षे, राहणार नाशिक) हा तिच्या घरात घुसला. घरात पीडितेचे सासू-सासरे आणि भाऊ उपस्थित होते. त्यांच्यासमोरच आरोपीने धमकी दिली की, “तुमची मुलगी माझ्याशी लग्न करत नसल्यास मी तिला जाळून टाकीन.”
काही वेळाने पीडिता घरी परतली तेव्हा आरोपीने तिलाही धमकी दिली. “तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबियांना जिवंत जाळून टाकीन,” अशी धमकी आरोपीने दिल्याचे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले.
घाबरलेल्या पीडितेने ही घटना कुटुंबियांना सांगितली. कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांना (१०० नंबर) फोन करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, आरोपी जून २०२४ पासून पीडितेला लग्नासाठी त्रास देत होता. तो तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत होता.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२९, ७८, ३५१ (2) आणि पोक्सो कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक उंडे (पवननगर पोलीस चौकी) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.