‘ख़ाकी’ वर हल्ला, समाजाचेच रक्षण करणाऱ्यांना गुंडांनी केले लक्ष्य! म्हसरूळमध्ये महिला पोलीस आणि सहकाऱ्यावर हल्ला; संतापाची लाट !
पोलीसांवरील हल्ला समाजासाठी धोक्याची घंटा
लाल दिवा-नाशिक,दि.१२ : आपल्या सुरक्षेसाठी दिवसरात्र कष्ट करणाऱ्या, ‘ख़ाकी’चा मान राखणाऱ्या पोलीसांवरच हल्ला झाल्याने संतापाची लाट पसरली आहे. म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद येथील छत्रपती विदयालय चौकात रविवारी सकाळी अकरा वाजता कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या सहकाऱ्यावर दोन टवाळखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. सुशिला हिरामण बाबंळे (वय ३८, रा. फ्लॅट क्र. ४०५, रॉयल रेसिडेंसी, आडगाव डि मार्ट मागे, म्हसरुळ, नाशिक) असे फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी यांचे नाव आहे. सौ. बाबंळे या म्हसरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्या रविवारी सकाळी आपले सहकारी मपोअं/२७९० मौळे यांच्यासमवेत छत्रपती विदयालय चौकात टवाळखोर कारवाई करत होत्या.
त्याचवेळी लाल आणि काळ्या रंगाच्या स्कूटर (क्र. MH 15 JB 9715) आणि काळ्या रंगाच्या हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH 15 JP 5786) वरून आलेल्या अंदाजे २० ते २५ वयोगटातील दोन इसमांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पाहता पाहता त्यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की सुरू केली. सौ. बाबंळे आणि त्यांचे सहकारी मौळे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना दमदाटी देऊन दोघेही तेथून पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सौ. बाबंळे यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोन्ही अज्ञात इसमांविरुद्ध भादंवि कलम १३२, ३५२, ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोउनि पटारे या गुन्ह्याचा तपास करीत असून, आरोपींचा शोध सुरू आहे. ही घटना निंदनीय असून, पोलीसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.