जमीन घोटाळेबाजांना धडकी! जमाबंदी आयुक्तांच्या नाशिक दौऱ्यामुळे खळबळ!
- कागदांच्या गर्तेतून मुक्तता! जमाबंदी आयुक्तांनी दाखवला भूमी अभिलेखांचा डिजिटल मार्ग!
लाल दिवा नाशिक, 04 सप्टेंबर 2024- भूमी अभिलेखांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख श्री. सचिंद्र प्रताप सिंह (भा.प्र.से.) यांनी आज नाशिक विभागाच्या भूमी अभिलेख विभागाच्या कामाचा आढावा घेतला. नियोजन भवन येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना कठोर निर्देश दिले.
या बैठकीला नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगांव, धुळे आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, तालुका कार्यालयातील उपअधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी आणि विशेष उपअधीक्षक, भूमी अभिलेख उपस्थित होते.
भूमापन प्रकरणांचा ९० दिवसांत निकाल लावण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत चालढकल न करता काम करण्याचे आदेश श्री. सिंह यांनी दिले. भूमी अभिलेखांचे डिजिटायजेशन करणून जनतेला कागदपत्रे जलद गतीने उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.
“फेरफार प्रकरणांमध्ये होणारा विलंब सहन केला जाणार नाही. “प्रथम अर्ज प्रथम निर्गती” (F.I.F.O) कार्यप्रणालीचा कडक अंमल करावा,” असे कठोर निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाण नगर भूमापन बाबत जलद गतीने कार्यवाही करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
भूमी अभिलेख विभागाच्या व्हर्जन-२, ई-चावडी, बल्क साइन, आकारबंद, एकत्रीकरण योजना यासारख्या विविध योजनांचा आढावा घेऊन त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीवर श्री. सिंह यांनी भर दिला.
या आढावा बैठकीमुळे भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे
सदर आढावासभेस जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म. राज्य) पूणे कार्यालयातील संलग्न उपसंचालक, जिल्हाधिकारी, नाशिक जलज शर्मा, नाशिक विभागाचे उपसंचालक भूमि अभिलेख महेश इंगळे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सदर सभेनंतर सिंह यांनी भूमि अभिलेख विभागाच्या नाशिक शहरातील कार्यालयांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली.