इथेनॉल निर्मितीला केंद्राकडून परवानगी: महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना दिलासा….!
लाल दिवा-मुंबई, दि. २९: राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने उसाचा रस आणि बी-हेवी मेालॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. या निर्णयाचे स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. यामुळे राज्यातील साखर उद्योगात चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत निर्बंध हटवण्याची मागणी केली होती.
राज्य शासनाच्या या प्रयत्नांना यश आले असून केंद्राने २०२४-२५ च्या गाळप हंगामासाठी इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध उठवले आहेत. यामुळे साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
या निर्णयामुळे आता राज्यातील साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना नवीन हंगामात उसाचा रस, सिरप, बी हेवी मेालॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे.
ही बाब राज्यातील साखर उद्योगासाठी आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.