देवळा तालुक्यात बेकायदा गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्ध्वस्त; १३६ सिलेंडर जप्त
सुर्वे यांची गॅस माफियांवर धाड, देवळा हादरला
लाल दिवा-नाशिक,दि.३०:-देवळा (प्रतिनिधी) – नाशिक ग्रामीण पोलिसांनी देवळा तालुक्यात बेकायदा गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळेवर धाड टाकून १३६ गॅस सिलेंडर, दोन चारचाकी वाहने आणि गॅस रिफिलिंगची साधनसामग्री जप्त केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत करण्यात आली
२९ नोव्हेंबर २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुंजाळ नगर ते सुभाष नगर परिसरात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला
या छाप्यात भागवत कारभारी जाधव (वय ४२, रा. सुभाषनगर, रामेश्वर फाटा, देवळा) याला रंगेहाथ पकडण्यात आले. जाधव हा कोणताही परवाना नसताना जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत प्रतिबंधित असलेला हा धोकादायक व्यवसाय चालवत होता. त्याच्याकडून १०१ घरगुती वापराचे आणि ३५ व्यावसायिक गॅस सिलेंडर, दोन पिस्टन पंप, इलेक्ट्रिक मोटर, वजनकाटा आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण ११,१५,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जाधव विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५०/२०२४ अंतर्गत भादंवि कलम २८७, २८८ आणि जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू सुर्वे (स्थानिक गुन्हे शाखा) आणि ज्ञानेश्वर जाधव (देवळा पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि दत्ता कांभीरे, पोहवा सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, सुभाष चोपडा, शरद मोगल आणि योगेश कोळी यांच्या पथकाने पार पाडली. अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी या कारवाईचे मार्गदर्शन केले.
ही कारवाई जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेचा एक भाग असून, भविष्यातही अशा कारवाया सुरू राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या बेकायदेशीर गॅस रिफिलिंगच्या धंद्यावर मोठा आघात झाला आहे.