नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध: वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 ने बसस्थानकांवर महिला प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या सराईत चोराला बेड्या ठोकल्या, पाच गुन्ह्यांचा उलगडा.
बसस्थानकांवरी आता सुरक्षितता! गुन्हे शाखेने पकडला महिलांच्या दागिन्यांवर डोळा ठेवणारा चोर.
लाल दिवा(नाशिक वृत्तसेवा) नाशिक शहरातील बसस्थानकांवर महिला प्रवाशांना लक्ष्य करून त्यांचे दागिने चोरणाऱ्या श्रीरामपूरच्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट १ ने बेड्या ठोकल्या आहेत. साहिल निसार पठाण (२३, रा. वार्ड नं. २, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) असे या चोराचे नाव असून त्याच्याकडून ३.५ लाख रुपये किमतीचे ४.५ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. त्याच्या अटकेमुळे सरकारवाडा आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यातील पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
२६ ऑक्टोबर रोजी ठक्कर बाजार बसस्थानकावरून मुंबई-नंदुरबार बसगाडीत चढणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेले होते. या घटनेनंतर अशाच प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट १ कडे सोपवला होता.
युनिट १ च्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हा चोर २७ ऑक्टोबर रोजी ठक्कर बाजार बसस्थानकावर येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि साहिल पठाणला रंगेहाथ पकडले. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला आणि चोरीचे दागिनेही पोलिसांना दाखवले.
पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्समधून दागिने चोरी करायचा. त्याच्या अटकेमुळे बसस्थानकांवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पठाणला ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि रविंद्र बागुल, पोहवा प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, सुकाम पवार, शरद सोनवणे, संदिप भांड, प्रविण वाघमारे, प्रदीप म्हसदे आणि जगेश्वर बोरसे यांनी केली.