अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात सुटे खाद्यतेल, लेबलदोषयुक्त औषधसाठा व परराज्यातील स्वीट मावा जप्त….!
लाल दिवा-नाशिक, दिनांक 4 ऑगस्ट 2023 अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री बाबत कठोर धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मे.प्रसाद प्रोव्हिजन, सुभाष पेठ, कळवण,नाशिक येथे छापा टाकला असता त्याठिकाणी खुल्या स्वरूपात 1 टन क्षमेतच्या टाकीतून नळाद्वारे खुल्या खाद्यतेलाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. 57 हजार 540 रूपयांचे 548 किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात ठेवण्यात आला असून विनापरवाना व्यवसाय करीत असल्याने व्यवसाय बंदबाबत विक्रेत्यास नोटीस दिली आहे.सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे मे.सैफी मेडिकल एजन्सीज,मामलेदार लेन, सोमवार वार्ड, मालेगाव या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेला Neautracuitical (Nutriown) चा साठा लेबलदोषयुक्त आढळला आहे. 24 हजार 940 रूपये किंमतीच्या 175 बॉटल्सचा साठा जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात दिला असून सदर प्रकरणी उत्पादकापर्यंत तपास करण्यात येत आहे. सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी केली आहे.
शहरातील बरेच मिठाई विक्रेते हे परराज्यातून येणाऱ्या स्पेशल बर्फीचा वापर पेढा, बर्फी , मिठाई व तत्सम पदार्थ बनविण्यासाठी वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विर ट्रव्हल्स आणि पार्सल सर्व्हिसेस, व्दारका, नाशिक येथे पाळत ठेवत तेथे आलेल्या एका खाजगी बसमधून मे. यशराज डेअरी ॲण्ड स्वीटस, उपनगर,नाशिक व श्री. शांतराम बिन्नर आडवाडी, ता.सिन्नर यांनी गुजरात मधून डिलिशिअस स्वीटस व हलवा हे अन्नपदार्थ मागविले असल्याचे निदर्शनास आले. संबंधित विक्रेत्यांकडून वरील अन्नपदार्थांचे नमुने घेवून उर्वरित 130 किलो वजनाचा 22 हजार 300 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन व प्रमोद पाटील यांनी केली आहे.
अन्न व औषध प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की, कोणीही खुल्या स्वरूपात खाद्यतेलाची फेरविक्री करू नये, परराज्यातील मावा वापरून मिठाई बनवून विक्री करू नये, औषधे विक्रेत्यांनी कायद्याच्या तरतुदीचे पालन करून व्यवसाय करावा तसेच खाजगी प्रवासी बसद्वारे व्यावसायिक दृष्टीने समान अथवा अन्न पदार्थ यांची वाहतुक करू नये अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहेत.
या तीनही ठिकाणाच्या कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) संजय नारागुडे व सह आयुक्त (अन्न) मनिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे..!