भद्रकालीची रात रक्तरंजित: गजेंद्र पाटील यांचा ‘सिंघम’ अवतार, गुन्हेगारांना चोहोबाजूंनी कोंडी!
भद्रकालीत धारदार शस्त्रांचा वापर करून गटांमध्ये तुंबळ हाणामारी; दोघे गंभीर जखमी, सात जणांवर गुन्हा दाखल
लाल दिवा-नाशिक,दि.२४:- (प्रतिनिधी) – शहरातील भद्रकाली परिसरात रविवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना २२ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भद्रकाली येथील बडी दर्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुन्ना कासार उर्फ उदय कैलास कुंभकर्ण (वय २३, रा. नवभारत, नाशिक) आणि त्याचे चार ते पाच साथीदार हे दुसऱ्या गटातील राहुल वसंत नंदन (वय ३२, रा. गंगावाडी, नाशिक) आणि त्याच्या साथीदारांशी जोरदार वाद झाला. हा वाद नेमका कशावरून झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र, काही क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद हाणामारीत रूपांतरित झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर मुन्ना कासारने राहुल नंदन यांच्या पोटात धारदार शस्त्राने वार केला. प्रत्युत्तरादाखल राहुल नंदन यांनीही मुन्ना कासार यांच्या मानेवर व डोक्यावर हल्ला केला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
या प्रकरणी पोलिसांनी मुन्ना कासार, राहुल नंदन, जयेश सुरेश जाधव (वय १९, रा. तेली गल्ली, नाशिक), सुरज भुजंगे, आकाश भुजंगे, श्रवण संजय गावीत (वय १९, रा. पाटील गल्ली, नाशिक) आणि अवधूत जाधव (रा. सिडको, नाशिक) यांच्यासह सात जणांवर भा.दं.वि. कलम १०९, १८९(२), १९१(३), १९० आणि १९४(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
भद्रकाली पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या या हाणामारीनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अफवा पसरू नये यासाठी पोलीस दलाने बंदोबस्त वाढवला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.