लाचखोरी प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि पोहेकॉन्स्टेबल रंगेहात अटक
लाचखोरीचे आव्हान: खाकी वर्दीतील काही बोटांमुळे संपूर्ण दलाला कलंक
लाल दिवा-नाशिक,दि.२४ :-शहरातील सातपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि एका पोहेकॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.
- घटनेची पार्श्वभूमी:
५१ वर्षीय एका तक्रारदाराने २०१८ मध्ये सातपूर येथील सम्राट बिल्डर्सकडून २३,५०,०००/- रुपयांना २ बीएचके फ्लॅट बुक केला होता. त्यावेळी त्यांनी बिल्डर कंपनीच्या संचालिका श्रीमती श्वेता गुप्ता यांच्या बँक खात्यात २१,०००/- रुपयांचा चेक अॅडव्हान्स म्हणून दिला होता. मात्र, ६ वर्षे उलटूनही तक्रारदाराला फ्लॅटचे कागदपत्र किंवा अॅडव्हान्स रक्कम परत मिळाली नव्हती.
तक्रारदाराने याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक धनराज सोनू गावित (वय ५७) आणि पोहेकॉन्स्टेबल कांतीलाल रघुनाथ गायकवाड (वय ४१) यांच्याकडे चौकशीसाठी देण्यात आली होती.
- लाच मागणी आणि सापळा:
तक्रारदार आणि बिल्डर यांच्यात चर्चा घडवून आणल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला २१,०००/- रुपयांचा चेक मिळवून दिला. या कामाबद्दल गावित आणि गायकवाड यांनी तक्रारदाराकडे “बक्षीस” म्हणून पैसे मागितले. सुरुवातीला तक्रारदाराने २०००/- रुपये दिले होते.
मात्र, त्यानंतरही गावित आणि गायकवाड यांनी पैशांची मागणी सुरूच ठेवली. अखेर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधला. विभागाने रचलेल्या सापळ्यात २४ ऑक्टोबर रोजी दोन्ही आरोपींना दोन साक्षीदारांसमक्ष २०००/- रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
- पुढील कारवाई:
दोन्ही आरोपींविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
- नागरिकांना आवाहन:
या प्रसंगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी लाच मागत असेल, तर त्यांनी ताबडतोब विभागाला संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक:
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक: 02562234020
टोल फ्री क्रमांक: 1064