दारूच्या नशेत तरुणाने ज्येष्ठ नागरिकाच्या गाडीची तोडफोड; पोलीस कारवाईत आरोपीस अटक
रामदास स्वामी नगरात कार तोडफोड, दारूड्या तरुणाला अटक
लाल दिवा-नाशिक,दि१४ :- (पोलीस प्रतिनिधी) रामदास स्वामी नगर परिसरात घडलेल्या गाडी तोडफोड प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. 13 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वाजता घडलेल्या या घटनेत दारूच्या नशेत असलेल्या तरुणाने ज्येष्ठ नागरिकाच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या.
प्राथमिक माहितीनुसार, फिर्यादी विलास दत्ताराम मोरे (वय 56) हे कामानिमित्त मुंबईला जाण्यासाठी घराबाहेर पडत असताना आरोपी साहिल खरणारे (वय 20) याने त्यांना अडवले. दारूच्या नशेत असलेल्या खरणारेने मोरे यांना शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने लोखंडी रॉडने मोरे यांच्या हुंडई आय-20 कारच्या काचा फोडल्या.
घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मोरे यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 110, 324(2), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक गोसावी आणि पावरा यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान, आरोपी खरणारे हा दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. त्याला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली.
पुढील तपास सुरू आहे.