राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त गंगा पाडळीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार?; उपसरपंचांकडून चौकशीची मागणी
लाखलगाव गंगा पाडळी ग्रामपंचायतीवर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, उपसरपंचांनी चौकशीची मागणी केली
लाल दिवा-नाशिक,दि.१० : राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त लाखलगाव गंगा पाडळी (ता. जि. नाशिक) या ग्रामपंचायतीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप उपसरपंच आत्माराम दाते यांनी केला आहे. १५ व्या वित्त आयोग आणि ग्रामनिधीच्या माध्यमातून आलेल्या निधीत हा भ्रष्टाचार झाल्याचे दाते यांचे म्हणणे आहे.
दाते यांनी विभागीय महसूल उपायुक्त डॉ. राणी ताठे यांकडे लेखी तक्रार दाखल करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत सहभागी झालेल्या दाते यांनी गावातील विकास कामांमध्ये आणि निधीच्या वापरात झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे म्हणून फोटो दाखवले.
ग्रामपंचायतीला मिळालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांमध्ये, तसेच इतर बांधकाम आणि सार्वजनिक वास्तूंच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
महसूल उपायुक्त डॉ. राणी ताठे यांनी या गंभीर आरोपांची दखल घेत जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाला तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. दाते यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री, जिल्हा परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही तक्रार दाखल केली असून, चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- प्रतिक्रिया:
“गावात झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे म्हणून मी लेखी तक्रार आणि फोटोसह निवेदन दिले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समिती, मुख्यमंत्री, जिल्हा परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन लवकरात लवकर गावाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.”
- आत्माराम नाना दाते, उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत लाखलगाव गंगा पाडळी, ता. जि. नाशिक