नाशिकमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, वरिष्ठ निरीक्षक कड यांच्या बदलीची मागणी
“दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त अपयशी”
लाल दिवा-नाशिक,दि.१० – पंचवटी परिसरात सोमवारी मध्यरात्री एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना घडली असून, गेल्या वीस दिवसांत घडलेली ही दुसरी खून घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, डबल राष्ट्रपती पदक प्राप्त असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या बदलीची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
कारंजा परिसरात सोमवारी रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी अतुल सूर्यवंशी (वय अद्याप समजू शकले नाही, रा. म्हसरूळ) या तरुणाचा पेव्हर ब्लॉकने डोक्यात मारून खून केला. ही घटना पंचवटी कारंजा पोलीस चौकीपासून अवघ्या काही अंतरावर घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल नरोत्तम भवन समोरील रस्त्याने चालत जात असताना काही अज्ञात हल्लेखोर त्याच्या दिशेने आले. त्यांनी अचानक अतुलला अडवले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर हल्लेखोरांपैकी एकाने जवळच पडलेला पेव्हर ब्लॉक उचलला आणि अतुलच्या डोक्यात जोरदार वार केला. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या अतुलला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांत पंचवटी परिसरात दरोडा, चोरी आणि मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत होती. या घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पंचवटी हे शहरतील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. परंतु गेल्या काही काळापासून येथील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांचा वावर नसल्याने गुन्हेगारांचे मनसुबी वाढले आहे.
नागरिकांनी या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या बदलीची मागणी केली आहे. कड यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीत वाढ झाली असून, त्यांना गुन्हे रोखण्यात यश आलेले नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.