बाप्पाच्या आगमनापूर्वी FDA ची ‘प्रसाद’ तपासणी मोहीम!
- गणेशोत्सवात भेसळीचे ‘विघ्नहर्ता’ FDA! अन्नसुरक्षेसाठी कडक पहारा
लाल दिवा-नाशिक,दि.६ :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि भेसळरहित अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कंबर कसली आहे. शहरातील विविध अन्न आस्थापनांवर विशेष लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मिठाई, दूध आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढते. याचा गैरफायदा घेत काही जण भेसळयुक्त पदार्थ विकण्याची शक्यता असते. हीच बाब लक्षात घेऊन FDA ने ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मिठाई दुकान, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थ विक्रेते आणि गणेश मंडळांच्या रसोळ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
या दरम्यान अन्न नमुने घेऊन त्यांचे प्रयोगशाळेत विश्लेषण केले जाईल. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना देखील काही सूचना देण्यात आल्या आहेत. महाप्रसादासाठी ऑनलाईन परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्वच्छता राखणे, ताजे अन्न वापरणे, दुधजन्य पदार्थांचा वापर टाळणे आणि पिण्यायोग्य पाणी वापरणे या बाबींवर भर देण्यात येत आहे.
मिठाई विक्रेत्यांना वापरयोग्य दिनांक असलेले साहित्य वापरण्याचे, परवानाधारकांकडूनच कच्चा माल खरेदी करणे, पिण्यायोग्य पाणी वापरणे, कामगारांची वैद्यकीय तपासणी करणे, खाद्यरंगाचा मर्यादित वापर, स्पेशल बर्फीचा वापर टाळणे, FSSAI परवाना क्रमांक स्पष्टपणे नमूद करणे आणि नाशवंत पदार्थांची सुरक्षित वाहतूक करणे यासह अनेक नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या मोहिमेमुळे नागरिकांना यंदाचा गणेशोत्सव निरामय आणि आरोग्यपूर्ण पध्दतीने साजरा करता येईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.