नाशिक: पत्नीचा आरोप, नवरा बनावट पोलीस अधिकारी म्हणून लोकांना लुटतोय
लाल दिवा-नाशिक,दि.३ -(प्रतिनिधी) नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने तिच्याच पतीवर बनावट पोलीस अधिकारी असल्याचा आरोप केला आहे. तीन वर्षांपासून तो लोकांना दमदाटी देऊन फसवत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. उज्वला सागर पवार (वय 37, राहणार विद्यायनिकेतन अपार्टमेंट, सिद्धटेकनगर, नाशिक) असे फिर्यादी महिलेचे नाव असून, सागर विष्णु पवार असे आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर पवार हा 2017 पासून स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून ओळख करून देत होता. तो पोलीस गणवेश परिधान करून फिरत होता शिवाय सोशल मीडियावर देखील गणवेशातील फोटो पोस्ट करत असे. आरोपीने “सपोनि व पोउपनि. सागर विष्णु पवार” असा नेमप्लेट देखील बनवला होता. या नेमप्लेटवर त्याने स्वतःचा पोलीस गणवेशातील पासपोर्ट साईजचा फोटो लावला होता.
आरोपीने या बनावट ओळखीचा वापर करून अनेक सरकारी कार्यालये आणि सामान्य नागरिकांना फसवले आहे. तो त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळत असे. जेव्हा पत्नीला या सर्व गैरकृत्यांची माहिती मिळाली तेव्हा तिने त्याला विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने पत्नीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सध्या अंबड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक आर.जी. टोपले (खुटवडनगर पोलीस चौकी) या प्रकरणाचा तपास करीत आहेत.