जनतेचा विश्वास, पोलिसांचा आधार! कोट्यवधींचा मुद्देमाल परत मिळवून नाशिक पोलिसांनी घडवला इतिहास!
लाल दिवा-नाशिक,दि२:-) नाशिक शहर पोलिसांनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत आणखी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. परिमंडळ-२ मधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये हरवलेला तब्बल ८,३४,४३,४४५/- रुपयांचा मुद्देमाल ६० फिर्यादींना परत करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक क्षण आज, दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी आदित्य हॉल, वडाळा पाथर्डी रोड, इंदिरानगर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात साकार झाला.
मा. आमदार श्रीमती सीमा हिरे यांच्या शुभहस्ते आणि नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरवास्पद सोहळा संपन्न झाला. यावेळी पोलिस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते
नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिस दल कटिबद्ध असल्याचे सांगितले. मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि गेला माल परत मिळवण्यासाठी पोलिसांचे अथक प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हा विक्रम घडवता आल्याबद्दल त्यांनी सर्व पोलिस दलाला अभिनंदन केले.
पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी माहिती दिली की, मुद्देमाल जप्त करून तो त्वरित फिर्यादींना परत करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार हे उद्दिष्ट साध्य झाले आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल परत करण्यासाठी मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी आणि मुद्देमाल कारकून यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले. दरमहा अशा प्रकारे मुद्देमाल परत करण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विशेषतः महिला फिर्यादींना त्यांचे स्त्रीधन परत मिळाल्याचा आनंद द्विगुणित झाला होता. सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने आणि मोबाईल फोन असा विविध प्रकारचा मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादींनी पोलिसांचे आभार मानले. डायल ११२ आणि सीपी व्हॉट्सअॅप नंबरच्या माध्यमातून मिळणाऱ्या तत्पर प्रतिसादाचेही त्यांनी कौतुक केले.
मा. आमदार श्रीमती सीमा हिरे यांनी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कौतुक केले आणि जनतेच्या हितासाठी राबविल्या जाणाऱ्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यातील विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले.
नाशिक पोलिसांनी घडवलेल्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास आणखीनच वाढला असून, गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.