नाशिकमध्ये ४५० ‘छोटे पोलीस’ झाले सज्ज, वाहतूक नियमांचे धडे गिरवले !
छोटा पोलीस’ उपक्रम: नाशिकच्या भविष्याला वाहतूक सुरक्षेचे धडे
लाल दिवा-नाशिक,ता.११: वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्व लहान वयातच बालगोपाळांमध्ये रुजविण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून रविवारी पाथर्डी फाट्यावरील मानवधन सामाजिक संस्थेमध्ये ‘छोटा पोलीस’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ४५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन शहर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुधाकर सुरडकर यांनी केले. यावेळी पोलीस हवालदार श्री सचिन जाधव यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती दिली. दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर, कारमध्ये सीट बेल्ट बांधणे, रस्त्यावर सिग्नलचे पालन करणे आदी नियमांचे महत्व त्यांनी पटवून दिले.
मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करू नये अशा बाबींविषयी देखील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच वाहतूक पोलिसांकडून वापरण्यात येणारी विविध उपकरणे यांची ओळख करून देण्यात आली.
यावेळी मानवधन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश कोल्हे आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.