कुणाल ज्वेलर्सवर चोरीचा धाडसी हल्ला! लाखोंचा ऐवज लंपास!
चोरीग्रस्तांना आधार देण्यासाठी नरहरी सेना पुढे, सारिका नागरेंचा पुढाकार
लाल दिवा-लोणी (प्रतिनिधी) – रात्रीच्या निबिड काळोखात चोरट्यांनी धाडसी हल्ला चढवत लोणी येथील कुणाल ज्वेलर्सचे दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ३ डिसेंबर रोजी रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचलून आत प्रवेश केला. दुकानातील सोने, चांदी, रोख रक्कम आणि वजन काटा असा पन्नास ते साठ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला.
सकाळी पाच वाजता लोणी पोलिसांनी दुकानमालक श्री. मदन उदावंत यांना फोन करून घटनेची माहिती दिली. अचानक आलेल्या फोनमुळे धास्तावलेल्या श्री. उदावंत यांनी तात्काळ भारतीय नरहरी सेनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख श्री. रवी माळवे यांना संपर्क साधला. पुण्यात असलेले श्री. माळवे सकाळी सहा वाजता निघून नऊ वाजता लोणी गाठले आणि मदतीसाठी धावून आले.
त्यांनी ताबडतोब प्रतिष्ठित समाजसेवक श्री. अभिजीत पेडगावकर यांच्याशी संपर्क साधला. श्री. पेडगावकर यांनी धीर देत परिस्थितीचा आढावा घेण्याचे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे मार्गदर्शन केले.
श्रीमती सारिका ताई नागरे,श्री. रवी माळवे, श्री. दत्तात्रय मैड आणि श्री. उदावंत यांनी लोणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून तपास सुरू केला आहे.
याप्रसंगी श्री. उदावंत यांनी भारतीय नरहरी सेनेच्या पदाधिकार्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि श्री. पेडगावकर यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “समाजसेवक म्हणजे हेच! संकटात धावून येणारे, आधार देणारे!” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांना पकडून कायद्याच्या कचाट्यात आणावे अशी मागणी नागरिक करत आहेत. घटनेच्या तपासात भारतीय नरहरी सेनेचे पदाधिकारी सहकार्य करत असल्याचे कळविण्यात आले आहे.
भारतीय नरहरी सेना पुतळा व स्मारक समिती प्रदेश अध्यक्ष श्रीमती सारिका ताई नागरे, नाशिक प्रसिद्धी प्रमुख श्री. रवी माळवे, उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. दत्तात्रय मैड, ज्येष्ठ समाजसेवक श्री. चिंतामणी आणि सौ. शकुंतला चिंतामणी, श्री. अशोक मैड आदी उपस्थित होते.