खलनायकाचा अखेर शेवट! तीन वर्षांपासून फरार अपहरणकर्ता अहिल्यानगरातून जेरबंद!
अहिल्यानगरातून ‘डॉन’ची धरपकड! नाशिक पोलिसांचा विजय
लाल दिवा-नाशिक,४:-(प्रतिनिधी): शहरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात अपहरणकर्त्या रविंद्र उर्फ दादु पोपट डोलनरला अखेर गुंडा विरोधी पथकाने अहिल्यानगर येथून बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे नाशिककरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
२०२२ सालच्या जून महिन्यात निलेश थोरात यांचा भाऊ कुणाल थोरात याचे डोलनर आणि त्याच्या साथीदारांनी अपहरण केले होते. पंचवटीतील वज्रेश्वरी झोपडपट्टीच्या मोकळ्या मैदानात त्याला नेऊन लाकडी दांडके आणि दगडांनी निर्घृणपणे मारहाण करण्यात आली होती. जुन्या भांडणाचा राग मिटवण्यासाठी त्यांनी कुणालला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ३६४, २०१, ३२३, ५०४, १४३, १४७, १४८, १४९, ३४ आणि मपोका १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र मुख्य सूत्रधार डोलनर मात्र फरार होता.
पोलस आयुक्त संदीप कर्णीक, उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथक डोलनरच्या मागावर होते. अखेर तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर पथकाच्या पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत डोलनरच्या अहिल्यानगर येथील नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला आणि ४ डिसेंबर २०२४ रोजी राहुरी कॉलेज रोडवरील चव्हाण वस्तीतून डोलनरला अटक करण्यात यश मिळवले.
कर्नाटक आणि गुजरात येथे ओळख लपवून राहणाऱ्या डोलनरला अखेर कायद्याच्या कचाट्यात आणण्यात पथकाला यश आले आहे. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त कर्णीक यांनी पथकाचे कौतुक केले आहे. सपोनि ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनिल आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव आणि प्रवीण चव्हाण यांच्या अथक परिश्रमांना या यशाचे श्रेय जाते.