संशयास्पद हालचाली होत असलेल्या बंद कारखान्यांची तपासणी :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस….!
लाल दिवा-नाशिक ,ता .८: नागपूर राज्यातील काही भागात बंद असलेल्या कंपन्यांमध्ये ड्रग्ज तयार करण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे संशयास्पद हालचाली होत असलेल्या बंद कारखान्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य अनिकेत तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांनी पकडला याविषयी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. याविषयी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ड्रग्जविषयी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. इतर राज्यातील यंत्रणेसोबत राज्यातील पोलीस समन्वयाने कार्यवाही करीत आहेत. राज्यात ड्रग्ज विरोधात कडक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सदस्यांनी केलेल्या सूचनांचाही सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.