घरातून ३.५८ लाखांचा ऐवज चोरीला, म्हसरुळ पोलिसांचा शोध सुरू

चोरी प्रकरणी म्हसरुळ पोलीसांचा तपास सुरू, आरोपींना लवकरच अटक करण्याचा विश्वास

लाल दिवा-नाशिक,दि.२६:-सारिका नागरे (प्रतिनिधी): धात्रकफाटा येथील आशापुरा हौसिंग सोसायटीमध्ये घराचे कुलूप तोडून ३.५८ लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्न समारंभासाठी मुंबईला गेलेल्या कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी हा प्रकार केला. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी आरोपींना लवकरच अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

फिर्यादी सचिन सुरेश सोनवणे (३०, रा. प्लॉट क्र. ३७, आशापुरा हौसिंग सोसायटी, धात्रकफाटा, नाशिक) हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६:४५ ते रात्री १०:४५ या दरम्यान ते मावस भावाच्या लग्नासाठी कुटुंबासह विक्रोळी, मुंबई येथे गेले होते. घरास कुलूप लावून ते निघून गेले होते. मात्र याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील दरवाजाची जाळी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाट आणि ड्रॉवरचे कुलूप तोडून ३५.१९० ग्रॅम वजनाचे १,५१,५१४ रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, १० ग्रॅम वजनाची ८०,००० रुपये किमतीची सोन्याची अंगठी, १० ग्रॅम वजनाचे ६६,६९७ रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स आणि ५०० रुपयांच्या नोटांमधील ६०,००० रुपये रोख रक्कम असा एकूण ३,५८,२११ रुपयांचा ऐवज चोरून नेला.

सोनवणे हे मुंबईहून परत आल्यानंतर त्यांना चोरीची घटना लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भा.दं.वि. कलम ३०५, ३३१ (३)(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे आणि पोलीस हवालदार चव्हाण हे अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

  • “आरोपींना लवकरच अटक करू”

या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके म्हणाले, “आरोपींचा शोध सुरू आहे. आम्ही वेगवेगळ्या अंगांनी तपास करत आहोत आणि लवकरच आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात येईल.” पोलिसांच्या या आश्वासनामुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!