नाशिककर सुखावले! पोलीस आयुक्त कर्णिक यांनी ३८९ सराईत गुन्हेगारांना केली हद्दपार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले
ब्रेकिंग: नाशिक पोलिसांचा मेगा ऑपरेशन! ३८९ गुंडांना शहर सोडण्याचे आदेश
लाल दिवा-नाशिक,दि,१३:-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ३८९ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
नागरिकांना निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी टवाळखोर, सराईत गुन्हेगार आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, दारू, अंमली पदार्थ, जुगार, मांस आणि इतर अवैध धंद्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, मुंबई नाका, सरकारवाडा, भद्रकाली, गंगापूर, सातपूर, अंबड, इंदिरानगर, चुंचाळे, उपनगर, नाशिक रोड, देवळाली कॅम्प आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३८९ गुन्हेगारांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अन्वये कारवाई केली आहे.
या कारवाईमुळे निवडणुका शांततेत पार पडण्यास मदत होईल आणि नागरिक भयमुक्त वातावरणात मतदान करू शकतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.