बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू
जमीन हक्क फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल
लाल दिवा-नाशिक,दि.३:-जमीन हक्कासंदर्भात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जयमल्हार गेंदाराम केदारे (वय ५९, रा. राजरत्ननगर, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रभाकर पांडुरंग केदारे आणि लक्ष्मीबाई पांडुरंग केदारे (रा. चांदवड, नाशिक) यांनी १९९५ ते २०१८ या कालावधीत बनावट कागदपत्रांच्या आधारे मौजे शिरसाणे येथील त्यांच्या वारसाहक्काच्या जमिनी बळकावल्याचा आरोप आहे.
फिर्यादीनुसार, आरोपींनी तहसीलदार कार्यालयात खोटे कागदपत्रे सादर करून, फिर्यादींचे वडील आणि चुलते यांच्या बनावट सह्यांचा वापर करून जमिनीचे वाटप केल्याचे भासवले. त्यांनी ७/१२ उताऱ्यावर फिर्यादींच्या वडिलांचे आणि चुलत्यांचे नाव कमी करून त्यांच्या पत्नी वेणुबाई पांडुरंग केदारे यांचे नाव लावले. या प्रक्रियेत कायदेशीर वारसदारांना कोणतीही नोटीस बजावण्यात आली नाही किंवा कायदेशीर प्रक्रियांचे पालन करण्यात आले नाही.
अविभाज्य शर्तीच्या जमिनीच्या मालकी हक्कात बदल करताना प्रांताधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असताना, आरोपींनी कोणतीही परवानगी न घेताच जमिनी आपल्या नावावर केल्याचा आरोप आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी शासनाची दिशाभूल केली आणि फिर्यादींची आर्थिक फसवणूक केली.
फिर्यादींनी जेव्हा जमीन हक्काबाबत आरोपींशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घुनावत हे तपास करत आहेत. आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटकेत नाहीत. पोलीस पुढील तपास करत आहेत.