महिलेवरील अत्याचाराचा निषेध, आरोपीला अटक; पोलिसांची सतर्कता आणि त्वरित कारवाई
महिला अत्याचाराविरोधात पोलिसांची ठाम भूमिका, आरोपीला बेड्या
लाल दिवा-नाशिक,दि.२८:-पंचवटी, प्रतिनिधी: नाशिक शहरातील पंचवटी परिसरात एका बांधकाम साईटवर काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव वसिम रहमतुल्लाह अख्तर (२४, रा. सिता गुफा जवळ, पंचवटी, मूळ रा. गोपालगंज, बिहार) असे असून तो देखील त्याच बांधकाम साईटवर काम करत होता.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च २०२४ पासूनच आरोपीने तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली होती. बांधकाम साईटवरील बाथरुम, तिचे राहते घर आणि शालीमार येथील एका लॉजमध्ये देखील तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे तिने म्हटले आहे. याशिवाय, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी असा मानसिक छळ देखील तिला सहन करावा लागला.
पीडित महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तिच्या तक्रारीनुसार, आरोपीने मार्च २०२४ ते जून २०२४ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी भा.द.वि. कलम ३७६ (एन), ३५४ (डी), ५०४, ५०६ आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणातील सर्व बाजूंचा विचार करून पोलिसांनी अत्यंत कार्यक्षमतेने काम केले आहे. पुढील तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
” पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल कौतुकाची थाप पडत आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचे यातून स्पष्ट होते.”
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी समाजाने एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे.