भुजबळ आजारी असूनही विशेष विमानाने नाशिकच्या कार्यक्रमास हजेरी लावणार!
आजारी असूनही भुजबळांचा फुलेंच्या कार्यक्रमासाठी अट्टाहास!
लाल दिवा-नाशिक,दि२७:- (संपादक-भगवान थोरात): राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. ना. छगनराव भुजबळ यांची प्रकृती काल अचानकपणे खालावली. गेल्या काही दिवसांपासून ताप आणि घशाचा त्रास सहन करत असलेले भुजबळ पुण्याहून काल मुंबईत दाखल झाले आणि सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी त्यांना पुरेसा आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
मात्र, शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित केलेल्या क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या भव्य पुतळ्यांच्या अनावरण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा त्यांचा दृढनिश्चय आहे.
समाजाप्रती असलेली आपुलकी आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल असलेला आदर व्यक्त करण्यासाठी भुजबळ विशेष विमानाने नाशिकला येणार असून कार्यक्रमानंतर पुन्हा विमानानेच मुंबईत उपचारासाठी परत येणार आहेत.
- नाशिककरांना उत्सुकता:
दरम्यान, नाशिकमध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या भव्य पुतळ्यांचे अनावरण सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. सावित्रीबाई फुले चौक, मुंबई नाका येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांचीही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
भुजबळ यांच्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम फिक्का होऊ नये यासाठी त्यांनी आजारी असतानाही कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यांच्या या समर्पण भावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे..