एक तास, सहा गुन्हेगार, आणि इंदिरानगर पोलिसांचा दणदणीत विजय!
शर्माळेंचा धडाकेबाज प्रहार: काजी मंजिलवरील खुनी खेळ संपला
लाल दिवा-नाशिक,दि.२३ : जुन्या वादातून रिक्षाचालकाच्या भाचाचा सहा जणांनी निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पाथर्डी गावात घडली. ही घटना २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळ गाठले आणि अवघ्या एका तासाच्या आत सहाही आरोपींना गजाआड केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नटेश विजय साळवे (रा. वील्लोळी, ता. नाशिक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नटेश हा रिक्षाचालक शशिकांत रामदास गांगुर्डे (वय २६, रा. संघर्ष नगर, नाशिक) यांचा भाचा होता. २२ सप्टेंबर रोजी रात्री नटेश हा पाथर्डी गावातील काजी मंजिल इमारतीसमोरून जात असताना त्याला सहा जणांनी गाठले. जुन्या वादातून आरोपींनी नटेशला धारदार शस्त्राने वार करत त्याचा जागीच खून केला. ही घटना पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शशिकांत गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी अत्यंत तात्काळ कारवाई करत यश उर्फ आयुष् दोंदे, प्रफुल दोंदे, दुर्गेश शार्दुल, रोहित वाघ, गौरव दोंदे आणि करण बावळ अशा सहाही आरोपींना एका तासाच्या आत अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनार करत आहेत