पालकमंत्री भुसे यांच्या प्रयत्नांना यश, नाशिकच्या लेकी एनडीएमध्ये!
नाशिकच्या लेकी एनडीएच्या दारात!
लाल दिवा-नाशिक,दि.२२ (प्रतिनिधी) – मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने २०२१ मध्ये घेतला. या निर्णयाच्या फलश्रुती म्हणून नाशिकमधील शासकीय सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्थातील तीन मुली एनडीएच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या आहेत. ही घटना नाशिकसाठी अभिमानास्पद असून, पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या विशेष प्रयत्नांना यातून यश आले आहे.
या यशस्वी विद्यार्थिनी जुई देशपांडे, संस्कृती तळमळे आणि हंसिका टिल्लू यांचे नाव देशभर गाजत आहे. या तिघींनी नुकत्याच पार पडलेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) एनडीए प्रवेश परीक्षेत यश मिळवले आहे. आता या मुली पुढील टप्प्यातील शारीरिक चाचणी आणि मुलाखतींना सामोरे जाणार आहेत.
दरम्यान, एनडीएमध्ये संपूर्ण देशातून फक्त १९ मुलींची निवड केली जाते, या पार्श्वभूमीवर नाशिकच्या या कामगिरीचे महत्व अधोरेखित होते.
ही शासकीय सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्था ही पालकमंत्री दादाजी भुसे यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. या प्रकल्पातून मुली एनडीएच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या यशाचे श्रेय विद्यार्थिनींच्या जिद्द आणि परिश्रमाबरोबरच संस्थेतील शिक्षक, कर्मचारी, वॉर्डन यांच्या मार्गदर्शनाला जाते.
या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उत्तीर्ण विद्यार्थिनींशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यांनी मुलींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नाशिकच्या या कामगिरीने देशभरातील मुलींना प्रेरणा मिळणार आहे. हे यश निश्चितच भविष्यात अनेक मुलींना संरक्षण क्षेत्रात करिअर घडविण्यास प्रोत्साहित करेल.