९३ लाख गेले शेअर बाजाराच्या मायाजालात! बनावट पोर्टलचा धक्कादायक प्रकार.

 सायबर पोलीस ठाणे गुरनं ७१/२०२४ – बनावट शेअर बाजार पोर्टलद्वारे ९३ लाखांची फसवणूक

लाल दिवा-नाशिक,दि. २१ सप्टेंबर २०२४ – सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा बनावट पोर्टलच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना लक्ष्य केले आहे. यावेळी बनावट शेअर बाजार पोर्टल तयार करून एका गुंतवणूकदाराची तब्बल ९३,८८,५६० रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत अज्ञात आरोपींनी एकत्र येऊन कोटक सिक्युरिटीज लिमीटेड (के.एस.एल.), कोटकप्रो आणि सिपकोटक सारख्या नामांकित वित्तीय संस्थांच्या बनावट पोर्टलची निर्मिती केली. त्यानंतर या टोळीतील एका सदस्याने फिर्यादी आणि इतर तिघांशी व्हॉट्सअॅप द्वारे संपर्क साधला. गुंतवणूकदारांना उच्च परताव्याचे आमिष दाखवून त्यांना बनावट पोर्टलवर खोटी खाती उघडण्यास भाग पाडण्यात आले. सुरुवातीला विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना काही प्रमाणात नफा देखील दाखविण्यात आला. 

आरोपींनी फिर्यादी आणि इतर तिघांकडून एकूण ९३,८८,५६० रुपये एवढी रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करून घेतली. मात्र, जेव्हा फिर्यादींनी आपली गुंतवणूक परत मागितली तेव्हा आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी तात्काळ सायबर पोलिसांत धाव घेतली. 

पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३१८(४), ३३६(३), ३३८, ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील फिर्यादींना पोलीस निरीक्षक ढवळे हे तपास करीत आहेत.

पोलीसांनी गुंतवणूकदारांना बनावट पोर्टल आणि आकर्षक योजनेच्या जाहिरातींबाबत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीची पडताळणी करणे आणि अधिकृत वेबसाइटचाच वापर करणे महत्वाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!