विधानसभेच्या ६७ वर्षांच्या वाटचालीत ४६१ महिला आमदार
यंदा किती महिला पोहोचणार विधानसभेत?
लाल दिवा-मुंबई,दि.१७:-येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेच्या ६७ वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेतला असता, आतापर्यंत केवळ ४६१ महिला आमदारांनाच विधानसभेत स्थान मिळाले आहे, ही वस्तुस्थिती समोर आली आहे. यंदाच्या निवडणुकीत ४१३६ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी ३६३ महिला उमेदवार आहेत.
१९५७ मध्ये पहिल्या विधानसभेपासून आतापर्यंत १४ विधानसभा अस्तित्वात आल्या आहेत. पहिल्या विधानसभेत सर्वाधिक ३० महिला आमदार निवडून आल्या होत्या, त्यापैकी ५ अपक्ष होत्या. त्यानंतरच्या विधानसभांमध्ये महिला आमदारांची संख्या कमी-अधिक होत राहिली. १९९०-९५ या काळातील आठव्या विधानसभेत केवळ ६ महिला आमदार होत्या, तर १९७८-८० च्या पाचव्या विधानसभेत ८ महिला आमदार होत्या. सध्याच्या चौदाव्या विधानसभेत २७ महिला आमदार आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील लिंग गुणोत्तर १००० पुरुषांमागे ९२९ महिला इतके होते. २०१९ च्या मतदार यादीनुसार हे प्रमाण ९२५ होते, जे २०२४ मध्ये ९३६ पर्यंत वाढले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी ९.७ कोटी मतदार नोंदणीकृत आहेत, त्यापैकी ४.६९ कोटी महिला मतदार आहेत. म्हणजेच जवळपास ५०% मतदार महिला आहेत.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदानाची टक्केवारी ६१.६९% होती, तर २०१९ मध्ये ५९.२६% होती. पुरुष मतदानाची टक्केवारी ६२.७७% होती. विधानसभेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढावे यासाठी महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करणे आवश्यक आहे.