महावितरणमध्ये भ्रष्टाचार! पदोन्नतीत आर्थिक उलाढाल, दिव्यांग कर्मचारी उपोषणाला
महावितरणमधील पदोन्नतीत कुणाचे हितसंबंध?
लाल दिवा-मुंबई,दि.१६:-महावितरण कंपनीत सहाय्यक अभियंता ते उप कार्यकारी अभियंता पदांच्या पदोन्नती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटनेने केला आहे. जुलै आणि सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या या पदोन्नतींमध्ये वरिष्ठ दिव्यांग कर्मचाऱ्यांना डावलून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना लाच घेऊन पदोन्नती दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
संघटनेने याबाबत तक्रार केल्यानंतर १४ ऑक्टोबर २०२४ रोजी बैठक घेण्यात आली होती. सात दिवसांत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाले होते, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके यांनी दिलेला बैठकीचा अहवाल अपूर्ण आणि दिशाभूल करणारा असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. रवींद्र सोनवणे यांनी महावितरणचे संचालक श्री. भादिकर, मुख्य महाव्यवस्थापक (तांत्रिक आस्थापना) श्रीमती सुचिता गुजर आणि उपमहाव्यवस्थापक श्री. राजेशिर्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सांगितले. २०२२ पासून दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संघटनेला संशय आहे. व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्रा यांनी या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत चौकशी टाळल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या ४% आरक्षणाची अंमलबजावणी, पदोन्नतीमध्ये सोयीस्कर पदस्थापना, प्रशासकीय/विनंती बदली, सहाय्यक तंत्रज्ञान आणि उपकरणे, दिव्यांग वाहतूक भत्ता, तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदसुनिश्चिती आणि श्री. कचकुरे यांना दिव्यांग हक्क कायदा २०१६ नुसार सेवेत सामावून घेणे यासारख्या मागण्यांबाबतही महावितरण प्रशासन उदासीन असल्याचे म्हटले जात आहे.
महावितरणच्या भ्रष्ट कारभार आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटनेने ३ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे पदाधिकारी, महावितरणचे दिव्यांग कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी होणार आहेत.