“मतदान हा हक्क नाही, कर्तव्य! – आशिमा मित्तल यांचा संदेश”
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीपची बैठक
नाशिक, दि. १८ (लाल दिवा वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करीत व्यापक उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी आशिमा मित्तल यांनी येथे दिले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी गठित स्वीप समितीची बैठक आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह नगरपालिका, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, गट शिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते.
श्रीमती मित्तल म्हणाल्या की, विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवात सर्वच मतदारांनी मतदान करून सहभागी होत या उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा. पालकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना पालक, नातेवाईकांना पत्र लिहिण्यासाठी प्रोत्साहित करावे. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, पोस्टर, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करावे. या स्पर्धांमध्ये शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. गृह भेटी देत मतदारांना मतदान करणे हा आपला हक्क असल्याची जाणीव करून द्यावी. चित्रपट गृह, मॉल, नाट्यमंदिरात जनजागृती करावी. सेल्फी पॉइंट उभारावेत. मतदान कसे करावे याविषयी सुद्धा जनजागृती करावी. भारत निवडणूक आयोगाच्या व्होटर हेल्प लाईन विषयी मतदारांमध्ये माहिती द्यावी.
गावागावांत जनजागृतीपर उपक्रम राबवावेत. आठवडे बाजारात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करावी, असेही आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मंगरुळे यांनी मतदान जनजागृतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.