मिठाईत भेसळ कराल, तर कारवाईला तयार राहा! – FDAचा इशारा
मिठाईत भेसळ? FDA चा सज्जड बंदोबस्त
लाल दिवा-नाशिक,दि.२२ (प्रतिनिधी) – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मिठाई दुकानांमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक मिठाईंनी सजावट करण्यात आली आहे. मात्र, याच आकर्षक रंग आणि चवीत लपलेल्या भेसळींपासून नागरिकांना वाचवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) सतर्क झाले आहे. FDA ने खवा, मावा आणि मिठाईची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.
आरोग्याला हानिकारक मिठाईंची विक्री रोखण्यासाठी FDA ची पथके शहरातील मिठाई विक्रेते, खवा-मावा विक्रेते आणि उत्पादकांवर लक्ष ठेवून आहेत. या पथकांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे FDA कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नुकतीच FDA ने मिठाई उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, नियमांचे पालन करण्याबाबत कडक सूचना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
- ग्राहकांना FDA कडून काळजी घेण्याचे आवाहन:
- मिठाई, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ केवळ परवानाधारक दुकानांतूनच खरेदी करा आणि बिल घेऊन जतन करा.
- मिठाई, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ताजे आणि गरजेनुसारच खरेदी करा.
- खरेदी करताना वापरण्याची अंतिम तारीख (Use by date) तपासा.
- उघड्यावर ठेवलेले पदार्थ खरेदी करू नका.
- माव्यापासून बनवलेल्या मिठाई २४ तासांच्या आत खाऊन टाका आणि फ्रिजमध्ये साठवा.
- मिठाईवर बुरशी आढळल्यास किंवा चव/वासा वेगळा जाणवल्यास ती खाऊ नका.
अधिक माहितीसाठी किंवा तक्रार नोंदवण्यासाठी FDA च्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा असे आवाहन FDA चे सह आयुक्त (अन्न) श्री. म. ना. चौधरी यांनी केले आहे.
(म. ना. चौधरी)
सह आयुक्त (अन्न)
अन्न व औषध प्रशासन (म.रा.) नाशिक