ऑनलाईन मॅट्रिमोनीचा दुसरा चेहरा, प्रेमाच्या बहाण्याने सुरु होता लाखोंचा खेळ!
३५ लाखांची फसवणूक, ऑनलाईन मॅट्रिमोनीमागील गूढ उलगडणार का ?
ऑनलाईन मॅट्रिमोनीचा वापर करत क्रूर ठोका, अमेरिकन प्रेमाच्या आडून लपलेला फसवणूक कारस्थान उघड!
लाल दिवा-नाशिक,दि.२४:– प्रेम आणि लग्नाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांना सावधान! ऑनलाईन मॅट्रिमोनीच्या विश्वासार्हतेचा बुरखा चढवून फसवणूक करणाऱ्या टोळीने शहरात हल्लाबोल केला आहे. यावेळी एका भोळ्या नागरिकाचे तब्बल ३५ लाख १३ हजार रुपये लुटण्यात आले आहेत.
पीडित व्यक्तीने (नाव गुलदस्त्यात) ‘BhartaMatrimonial.Com’ या वेबसाईटवर आपला प्रोफाइल तयार केला होता. लग्नासाठी योग्य जोडीदार शोधत असताना त्यांना “मायकल गार्विन” नावाच्या एका आकर्षक प्रोफाइलने आकर्षित केले. हा “मायकल”, अमेरिकेत राहणारा आणि ‘Assocengrs Company’ मध्ये उच्च पदावर कार्यरत असल्याचे भासवत होता.
व्हॉट्सअॅप क्रमांक +1 (407) 639-3231 वरून गोड शब्दांत गोंधवत त्याने पीडितांचा विश्वास संपादन केला. विवाहानंतर दोघांनी मिळून मेडिकल फार्मा कंपनीसाठी आवश्यक “एक्सट्रॅक्ट ऑईल” खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न त्याने दाखवले.
अमेरिकेतील ‘Betabiopharma’ या कंपनीशी त्याचे व्यवहार असल्याचे सांगत भारतातील ‘कुमार एंटरप्रायझेस’ या कंपनीकडून ‘एक्सट्रॅक्ट ऑईल’ खरेदी करण्याचा सल्ला दिला. या खरेदीसाठी ‘सुजात कुमार’ नावाच्या एका महिलेचा संपर्क क्रमांक (८४१३०३७३८५, ६९०९१४०१९६) देण्यात आला.
प्रेमाच्या भुरळीत पडलेल्या पीडिताने ‘सुजात कुमार’ हिच्या आयडीएफसी बँक खात्यात (१०७२०५१६८५४) आणि इंडियन ओव्हरसीज बँकेच्या खात्यात (१४४९०२००००००४८१) आरटीजीएसद्वारे टप्प्याटप्प्याने ३५,१३,००० रुपये जमा केले.
दिनांक २४ जुलै २०२४ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ही फसवणूक सुरु होती. जेव्हा “मायकल” व “सुजात” दोघेही संपर्काबाहेर गेले तेव्हा पीडितांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु आहे. ऑनलाईन मॅट्रिमोनीच्या माध्यमातून लग्न जुळवण्याच्या विचारात असलेल्यांनी अशा प्रकारच्या फसवणुकींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.