मालेगावची दुर्दशा कोणी केली…..कसम खाई हैं क्या विकास होणे नहीं देंगे……. नक्की वाचा चंदन पवार यांचा डोळे उघडणारा लेख…!
143 गावांचे वलय लाभलेले शहर, तेरे को-मेरे को, तुले-माले, सलाम वालेकुम ते रामराम असे शब्द ऐकल्याशिवाय मालेगाव पूर्ण होऊच शकत नाही, परंतु मालेगाव ला कोणाचे ग्रहण लागले की ईच्छाशक्ती म्हणावी इंग्रजांनी ज्या स्थितीत मालेगाव सोडले आज ही मालेगाव त्याच स्थितीत सापडेल.मालेगावच्या रहिवाश्यानां कधी काळी प्रगतीची आशा दिसेल देव जाणे, कारण आज तरी सामाजिक कार्यकर्ते सोडून कोणीही मालेगावच्या प्रगतीसाठी झटतांना दिसत नाही, भगवान आणि अल्ला मिळून कोणाला तरी सद्बुद्धी देतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही
महाराष्ट्र राज्याच्या नासिक जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण व नासिक खालोखालचे मोठे उद्योगप्रधान शहर, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आणि मोसम नदीच्या डाव्या तीरावर वसलेले हे शहर. येथील नदीकाठचा भुईकोट किल्ला नारोशंकर यांनी बांधला असून (१७४०) उत्तर पेशवाईत त्याचा संरक्षणाची गढी म्हणून उपयोग होई. इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव केल्यानंतर तो ताब्यात घेतला (१८१८) आणि तेथे लष्करी तळ ठेवला. या शहरात कमीत कमी शंभर लहानमोठी मंदिरे व जवळपास ४३ मशिदी आहेत. येथे अरबांची वस्ती मोठ्या प्रमाणावर झाली होती त्यांपैकी बहुसंख्य मायदेशी परतले आहेत.
कापूस उत्पादन व दळणवळणाची सुलभता यांमुळे मालेगावचे कापड उद्योगातील महत्त्व वाढले आहे. येथे सुमारे ४०,००० यंत्रमाग व १,५०० हातमाग आहेत. यांशिवाय दोरखंड केरसुण्या, बुरूडकाम, चटया इ. लघुउद्योग मोठ्या प्रमाणावर चालतात. कापड उद्योगात येथील मोमीन अग्रेसर आहेत. मालेगावी साडी आणि कापड महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पांझण प्रकल्पामुळे मालेगावचा परिसर सुपीक झाला असून कापूस, भुईमूग, गहू, बाजरी, कांदा डाळिंब इ. प्रमुख पिके मालेगावच्या व्यापारी पेठेत येतात. मालेगावच्या तुरेत “मॉलिवूड” नावाचा फिल्मी कल्पवृक्ष रोवला गेला आहे, अहिराणी, उर्दू, मराठी आणि हिंदी अश्या प्रमुख भाषा बोलल्या जातात, शहरात उर्दू आणि मराठी दोन्ही माध्यमांच्या ६० प्राथमिक शाळा आहेत. येथील शैक्षणिक क्षेत्रात भाऊसाहेब हिरे व त्यांनी स्थापन केलेली महात्मा गांधी विद्यामंदिर ही संस्था व त्यांचे कार्य मोठे आहे. शहरात अकरा माध्यामिक शाळा, वाणिज्य, व शास्त्र महाविद्यालये, दोन शिक्षक-प्रशिक्षण महाविद्यालये, एक तांत्रिक व एक कृषि-विद्यालय सुद्धा आहे.
मालेगाव मध्ये बाह्य आणि मध्य असे दोन मतदारसंघ स्थापन झाले आहेत पूर्वीचा दाभाडी मतदार संघ आता मालेगाव बाह्य मतदार संघ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. भाऊसाहेब हिरे यांचा मतदार संघ अशी देखील त्याची ओळख आहे, स्वातंत्र्यानंतर हा मतदार संघ कॉग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. भाऊसाहेब हिरे, डॉ.बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे आणि अलीकडे 2004 पर्यंत या मतदार संघात हिरे घराण्याचे वर्चस्व होते. पुष्पाताई हिरे नंतर प्रशांत हिरे यांनी एकदा शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी असा प्रवास करत राज्य मंत्रीपद मिळवले. 2004 साली दाभाडी मतदार संघात दादा भुसे यांचा प्रवेश झाला शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंड करत दादा भुसेंमागे शक्ती उभी केली. भुसे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत प्रशांत हिरे यांचा पराभव केला.
2009 च्या निवडणुकीत अधिकृतपणे सेनेच्या तिकिटावर उमेदवारी मिळवत पुन्हा एकदा भुसे यांनी हिरे यांचा पराभव केला आणि हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला व प्रशांत हिरे यांनी राजकारणातून काढला पाय घेतला, जर त्यांनी त्या वेळेस राजकारणातून संन्यास घेतला नसता आणि तळागाळातील लोकांसाठी जीव ओतून काम केले असते तर आजच्या राजकारणाची दिशा आणि दशा वेगळी राहिली असती, माझ्या मते अपूर्व हिरे दाभाडी मतदारसंघातुन आमदार आणि आज मंत्री राहिले असते आणि प्रशांत हिरे खासदार नक्कीच राहिले असते, असो शेवटी प्रत्येकाचा वयक्तिक निर्णय असतो.
2019 च्या निवडणुकीत दादा भुसे समोर सक्षम पर्याय देण्यासाठी सर्वपक्षीय विरोधकांनी बैठक घेत निवडणुकीची रणनिती आखण्यात आली. सेना-भाजपची युती न झाल्यास भाजपकडून नगरसेवक सुनिल गायकवाड हे उमेदवार राहू शकतात, तर कॉंग्रेसकडून प्रसाद हिरे आणि कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांचे नावे चर्चेत आलीत. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे नाव समोर आले परंतु राजकीय संन्यास ची कास धरल्यामुळे त्यांचे नाव शर्यतीतून बाहेर झाले त्यानंतर त्यांचे पूत्र अद्वय हिरे हे दावेदार मानले गेलेत, दुसरीकडे भुसे यांचे सुरुवातीपासून जवळचे असणारे पण त्यावेळेस त्यांच्यापासून दुरावलेले बाजार समितीचे संचालक बंडूकाका बच्छाव यांनी बाराबलुतेदार संघटनेच्या माध्यामातून स्वतःचा सवतासुभा उभा केला, त्यासाठी त्यांनी मेळावा घेत अप्रत्यक्षपणे शक्ती प्रर्दशन केले या घडामोडींमुळे तालुक्यातील राजकारण मात्र चांगलेच ढवळून निघाले होते.
डॉ.तुषार शेवाळे यांना एकमताने तिकीट देण्यात आले, मालेगावच्या राजकारणात आपले महत्त्व अधोरेखित करणारे अद्वय हिरे, प्रसाद हिरे,राजेंद्र भोसले आणि जयंत पवार यांनी डॉ शेवाळेनां निवडून आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत परंतु दादा भुसे पुन्हा एकदा चांगल्या मताधिक्याने निवडून आलेत आणि त्यांनी सर्वपक्षीय उमेदवार डॉ.तुषार शेवाळे यांचा जवळपास 50 हजार मतांनी दारुण पराभव झाला, हा पराभव का झाला याविषयी लोकांमध्ये उलट सुलट चर्चा आहे, सत्याचा विजय होईल आणि मालेगाव ची थांबलेली गती पुन्हा प्रगतीकडे पीटी उषा सारखी धावेल,अशी आशा असतांना झालेला पराभव असंख्य ईमानदार कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला, विजय निश्चित असतांना अचानक मतदानाच्या दोन दिवस आधी कोणती चक्रे फिरलीत? की विनाशकालिन विपरीत बुद्धी झाली हे कोडे अजून सुटलेले नाही, या गोष्टीमुळे ईमानदार, मेहनती कार्यकर्त्यांच्या तोंडावर पुन्हा मानवनिर्मित थप्पड पडली.अश्या एक अनेक गोष्टीमुळे मालेगाव पुन्हा मागे ओढले गेले.
मालेगावला स्वतंत्र जिल्हा करण्यात यावा अशी मागणी गेल्या 25 वर्षांपासून होत आहे. प्रत्येक निवडणुकीत मालेगावला जिल्हा करण्याचे गाजर दाखविले जाते मग जनता पुन्हा खुश होते आणि उत्साहात मतदान करते, आश्वासन देऊनही पुन्हा पदरी निराशा पडते हे दुष्टचक्र सालाबादप्रमाणे अद्यापपर्यंत चालूच आहे
वांजुळपाडा संघर्ष समितीनेही गेल्या काही महिन्यांपासून कसमादे परिसरात नार-पार पाणी योजना आणण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे, त्यात के.एन.अहिरे, शांताराम आहेर, ॲड.शिशिर हिरे, शेखर पवार, विश्वास देवरे, भाऊसाहेब पवार, अनिल निकम, निखिल पवार आणि कुंदन चव्हाण यांनी सरकारकडे पाठपुरावा केला आहे परंतु सरकार नेहमीप्रमाणे अभ्यास करण्यास गुंतले आहे. नार-पार, अंबिका , औरंगा व ईतर पश्चिम वाहिन्या नदीचे पाणी पूर्वेला वळवून गिरणा खोरेत टाकणे, यासाठी या भागाची जनता ५० वर्षापासून विविध मार्गांनी सातत्याने मागणी करीत आहे, दमणगंगा, नार-पार, मांजरपाडा या नद्यांचा प्रश्न असो, जिल्ह्यातील राजकारणात पाणी प्रश्न चांगलाच गाजू लागला आहे, माजी राज्यमंत्री डॉ. प्रशांत हिरे यांचाही नार-पार विषयीचा अभ्यास मोठ्या प्रमाणात आहे, त्यांनीही यासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या सरकारकडे अनेक वेळा पाठपुरावा केला आहे, यासाठी त्यांनी गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असतांना १९९६-९७ मध्ये नार-पार योजनेचे सव्र्हेक्षण करून घेतले,विशेष म्हणजे हिरे यांनी स्वखर्चातून हा सर्व्हे केला होता. कसमादेच्या पाण्यावर शासकीय दरोडा’ अशी हाक देत नोव्हेंबर २००८ मध्ये उमराणे गावात सर्व पक्षीय रास्तारोको झाला. त्यावेळी दादा भुसेनी गैरहजर राहत ही फसवी योजना आहे,असे सांगून जनतेची दिशाभूल केली होती. मालेगावचे दुर्दव्य बघा जे काही मालेगावच्या जनतेच्या फायद्याचे आहे त्याचा मुद्दा बनतो म्हणजे बनतोच,विरोध करणारे आपलेच असतात मग ते मालेगाव जिल्हा निर्मितीचे का होईना, विकासाचा विरोध पाचविलाच पुजलेला आहे त्यामुळे आज मालेगावचा विकास खेडे गावापेक्षाही खालावलेला आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे.
नाशिक जिल्ह्यातून आजपर्यंत मंत्रीपदाची सर्वात जास्त संधी मालेगाव तालुक्याला मिळाली आहे. दिवंगत श्री भाऊसाहेब हिरे,डॉ बळीराम हिरे, व्यंकटराव हिरे, निहाल अहमद, श्रीमती पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे आणि आता दादा भुसे. मालेगाव जिल्ह्यातील दाभाडी आणि मालेगाव विधानसभा क्षेत्रातून निवडून गेलेल्या नेत्यांनी अधिक कालावधीसाठी जिल्ह्याचे राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व केले आहे, पूर्वीच्या शिवसेना-भाजप युतीच्या मंत्रिमंडळात चार मंत्रिपदे मिळाले आहेत.तीस वर्षापूर्वी श्री ए. आर अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मालेगाव जिल्ह्याच्या निर्मितीची कल्पना मांडली.त्यानंतर ही घोषणा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तर विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेकांनी केली. आता तर असे वाटते मालेगाव जिल्ह्याची निर्मिती ही फक्त तालुक्यातील राजकीय नेत्यांनी त्यांच्या राजकारणासाठीची सोय केलेली असून जनतेच्या भावनांची चेष्टा चाललेली आहे प्रत्येक वेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव जिल्हा करण्याची मागणी केली जाते. निवडणुकीच्या प्रचारात नेहमीप्रमाणे विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही बाजूंकडून मालेगाव जिल्हानिर्मितीचे आश्वासन दिले जाते. निवडणूक संपल्यावर जिल्हानिर्मितीचा विषय बाजूला पडतो. त्यानंतर पुढील निवडणूक येईपर्यंत ना सत्ताधाऱ्यांकडून या विषयावर चर्चा होते ना विरोधकांकडून हा विषय पुन्हा मांडला जातो.
आज मालेगावात इतके प्रश्न आहेत की मोजता येणार नाहीत,
#मालेगावातील काही मुख्य प्रश्न ज्याचे उत्तर खासदार, मंत्री महोदय,आणि सरकारी व्यवस्थेने द्यावीत
1.मालेगाव शहर भकास का वाटते, झाडे नावालाच का दिसतात यासाठी जबाबदार कोण आहे?
2.आज प्रत्येक रस्त्यावर नाका तोंडात धुळीशिवाय काहीही जात नाही.रस्त्यांची दुर्दशा कोणामुळे झाली आहे?
3. खेड्यावरील जनता आपली सरकारी कामे करण्यासाठी तहसील ला येतात, त्या तहसील आणि प्रांत ऑफिस मध्ये चक्क नाक मुठीत धरून चालावे लागते एव्हढ्या मोठ्या प्रमाणात टॉयलेट ची दुर्गंधी पसरलेली आहे, स्वच्छ भारत ची ऐसी तैसी कोणामुळे?
4.कित्येक सरकारी कामे अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत त्यामुळे सर्वत्र अस्ताव्यस्त दगड, माती कचरा पडलेला आहे, जबादारी कोणाची?
5. मालेगावात सरकारी बगीचे फक्त शोभेची झाली आहेत, प्रचंड भ्रष्टाचारामुळे गार्डन ची अवस्था स्मशानासारखी झाली आहे, तर काही ठिकाणी गर्दुल्ले आणि दारुड्याचा अड्डा बनला आहे,हे कोणामुळे?
6. मालेगाव शहराची लोकसंख्या आणि विस्तार पाहता, स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन करण्याचे अत्यंत आवश्यक असतांना अजून कोणाची इच्छाशक्ती का झालेली नाही?
7. रात्र पहाटे वाळूचा बेकायदा उपसा कोणाच्या आशीर्वादामुळे चालू आहे आणि किती टक्क्याचे आर्थिक गणित जुळलेले आहे ?
8.तालुक्यातील काही खेडेगावात अजूनही रस्ता झालेला नाही, 1947 च्या वेळेचा अनुभव अजूनही तेथील लोक घेत आहेत हे कोणामुळे?
9. बेशिस्त वाहतुकीमुळे अनेक घटनांना सामोरे जावे लागत आहे याची जबाबदारी कोणाची?
10. शहरात अनेक प्रकारचे अवैध धंदे सर्रासपणे चालू आहेत हे कोणाच्या कृपेने?
11.सरकारी कार्यालयातील दलालांचा विळखा कधी सुटेल, दलाल जसे त्या कार्यालयातील कर्मचारी आहेत ह्या पद्धतीने लोकांशी वागत आहेत, सामान्य लोकांची ही चोरी आणि लूटमार कोण थांबविणार आहे?
12. म्हाडा घरकुल योजनेच्या 16 हजार घरांच्या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे, फ़क्त 60% काम झाले आहे, ह्या परिस्थितीचा जनक कोण आहे ?
हे मालेगाव आहे की #नॉर्थ कोरिया हेच समजत नाही, कारण ज्या देश्यात हुकूमशहा राज्य करतो तो देश कधीही प्रगती करीत नाही, तसेच मालेगावच्या बाबतीत आज बघावयास मिळत आहे, #प्रगती आणि #विकास याचा मालेगावचा दुरपर्येंत काहीही सबंध दिसत नाही, कारण प्रत्येक आघाडीवर जसे, मालेगाव जिल्हा असो, नार पार प्रकल्प असो, पोलीस आयुक्तालय असो, भारत सरकारच्या योजना असोत, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो, हरित क्रांती असो, स्वच्छता असो, सर्व आघाडीवर फक्त आणि फक्त उदासीनता आणि स्वार्थी मनोवृत्ती दिसून येते आहे मालेगावात गेल्यावर आजच्या तरुणाईला त्यांच्या भाषेत #फ्रेश वाटत नाही, झाडे नाहीत त्यामुळे उन्हाळा हा तापलेल्या तेलात तळून काढल्यासारखे वाटतो, मालेगावचे तरुण बाहेरगावी गेल्यावर मालेगाव विषयी सांगताना एकच गोष्ट मोठ्या फुशारकीने सांगतात ते म्हणजे आजही आमच्या मालेगावात चहा 2 रुपयात मिळतो, असे ते सांगू शकतात, कारण त्यांना प्रगती आणि विकासाच्या नावाने फक्त तेव्हढेच दिसते आ utहे ना? मग यासाठी जबाबदार कोण? जनता जनार्धन कधी प्रश्न विचारणार आहात आपल्या माननीय #लोकप्रतिनिधींना.
*- चंदन पवार*