आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत आज आरोग्य मेळाव्यांचे आयोजन…..!
लाल दिवा -नाशिक, दिनांक : 22 सप्टेंबर, 2023
केंद्र शासनाच्या आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत आरोग्य मेळावे व सभांचे आयोजनास सुरवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन शनिवार 23 सप्टेंबर रोजी या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील एकुण 7 ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय व जिल्ह्यातील 577 आरोग्य संस्थामध्ये आयुष्यमान आरोग्य मेळावे घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होऊन आरोग्य विषयक सोयी सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे, अशी माहिती जिल्हा आारोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे या साप्ताहिक मेळाव्यात प्रामुख्याने स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, कान, नाक व घसा, त्वचारोग, मानसिक आजार, दंत शल्य चिकित्सक तपासणी, महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकिय शिक्षण व संशोधन संस्था नाशिक, डॉ. वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालय व संशोधन संस्था व एस.एम.बी.टी वैद्यकिय महाविद्यालय तालुका ईगतपुरी येथील तज्ज्ञांच्या द्वारे ग्रामीण रुग्णालय सुरगाणा, बाऱ्हे, पेठ, दिंडोरी, देवळा, ईगतपुरी, घोटी येथे 23 सप्टेंबर 2023 रोजी आरोग्य मेळाव्यात संदर्भित झालेल्या रुग्णांना औषधोपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये 2 ऑक्टोबर रोजी आयुष्यमान सभा आयोजीत करण्यात येणार आहेत. या सभेत नागरिकांना आरोग्य विषयक सर्व योजनांची माहिती आयुष्यमान गोल्डन कार्ड व आभा कार्ड, पी एम जे वाय, एन सी डी, टी बी मुक्त पंचायत इत्यादी आरोग्य विषयक कार्यक्रमाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अशोक थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले असुन जिल्हा स्तरावरुन सनियंत्रण जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते, अतिरिक्त जिल्हा आारोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र बागुल, जिल्हा परिषदेचे सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक लोणे, डॉ.युवराज देवरे हे करणार असल्याचे ही जिल्हा आारोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी कळविले
आहे.